पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही मतदारसंघाची रणनीती निश्चितीसाठी शरद पवार यांच्या ‘मोदीबाग’ या निवासस्थानी बुधवारी बैठका आणि पक्षप्रवेश झाले. बीड, सातारा, माढा मतदारसंघासंदर्भातील पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांच्यासमवेत चर्चा केली. यामध्ये महादेव जानकर, सातारचे शशिकांत शिंदे, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर, उपराकार लक्ष्मण माने यांनी पवार यांच्यासमवेत चर्चा केली.
दरम्यान, ‘शिवसंग्राम’च्या नेत्या आणि दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी डाॅ. ज्योती यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्षप्रवेश तांत्रिक कारणांमुळे बुधवारी लांबणीवर पडला. तर अजित पवार यांच्यासमवेत गेलेले बीड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बजरंग सोनावणे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश झाला. पुणे मुक्कामी असलेल्या शरद पवार यांची मोदीबाग येथे विविध राजकीय नेत्यांनी भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यावेळी उपस्थित होते.
हेही वाचा >>> गुप्त पद्धतीने आणि गनिमी काव्याने पार्थ पवारांचा प्रचार चालू : अजित पवार
माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास महादेव जानकर इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते निवडणूक लढवतील, अशी चर्चा काही दिवसांपासून आहे. त्यातच जानकर यांनी दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेतही चर्चा केली होती. त्यानंतर जानकर यांनी बुधवारी शरद पवार यांची भेट घेतली. राष्ट्रीय समाज पक्षाला माढा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. मात्र, त्याबाबत बैठकीत अधिकृत निर्णय झाला नाही. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही त्याला दुजोरा दिला. जानकर आमचेच असून ते संपर्कात आहे. माढा लोकसभेसंदर्भातील उमदेवार लवकरच जाहीर केला जाईल, असे पाटील यांनी सांगितले.
श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर यांनीही पवार यांची भेट घेतली. मात्र, ही भेट राजकीय नव्हती. वाफगाव किल्ल्यासंदर्भातील ही भेट होती. धनगर समाजाचे जो नेतृत्व करेल आणि समाजाच्या प्रश्नांना न्याय देईल, त्याला उमेदवारी मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त करतानाच समाजाच्या भल्यासाठी राजकारणात यावे लागत असेल तर नक्कीच राजकारणात सक्रिय होईन, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.
हेही वाचा >>> सहकार आयुक्त सौरभ राव यांचा जाता-जाता लेखापरीक्षकाला दणका
उपराकार लक्ष्मण माने यांनीही लातूर लोकसभा मतदारसंघासंदर्भात पवार यांच्यासमवेत चर्चा केली. लातूर लोकसभा मतदारसंघातून माने इच्छुक आहेत. महाविकास आघाडीकडे ही जागा काँग्रेसकडे आहे. या जागेसंदर्भात पवार यांच्यासमवेत त्यांनी चर्चा केली. काँग्रेसकडे सक्षम उमेदवार नसल्याचे माने यांनी सांगितले.
सातरचे शशिकांत शिंदे, माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनीही पवार यांची भेट घेतली. या बैठकीत मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. सातारा लोकसभा मतदारसंघातील सर्व तालुक्यांत महाविकास आघाडीचे मेळावे घेण्याची सूचना पवार यांनी केली.
पवार यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश बीड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बजरंग सोनावणे, पुण्यातील मनसेचे माजी नगरसेवक राहुल तुपेरे, भाजपचे शहर चिटणीस सुनील माने, माजी नगरसेवक आरिफ बागवान, हवेलीचे माजी पंचायत समिती सदस्य सुनील खेडेकर यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.