विधानसभेसाठी आम्ही १४४ जागांची मागणी केली आहे. काँग्रेसकडून त्यास नकार दिल्यामुळे जागावाटपाबाबत चर्चा थांबली आहे. स्थानिक पातळीवर चर्चा करून काही उपयोग नाही. त्यामुळे त्याबाबत शनिवारी दिल्लीत दोन्ही पक्षांच्या सर्वोच्च नेत्यांची बैठक होणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
आघाडीतील जागावाटपाबाबत अजित पवार यांना विचारले असता, राज्यातील नेत्यांची याबाबतची चर्चा थांबली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्थानिक पातळीवर चर्चा करून उपयोग होत नाही, हा अनुभव लोकसभेच्या वेळेलाही आला आहे. त्यामुळे दिल्लीत दोन्ही पक्षांच्या सर्वोच्च नेत्यांच्या चर्चेमध्ये मार्ग निघू शकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आघाडी झाली नाही, तर आपापल्या परीने सर्व प्रकारची तयारी असावी, यासाठी इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. त्याबाबत पक्षाध्यक्षांनी भूमिका स्पष्ट केल्यामुळे आपण जास्त भाष्य करणार नाही, असेही ते म्हणाले.
 भाजपचे आरोप फेटाळले
मागील पंधरा वर्षांत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीने एकापाठोपाठ एक घोटाळे करून ११ लाख ८८ हजार कोटी रुपयांचे घोटाळे केले असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मुंबईत केला होता. त्याबाबत विचारले असता अजित पवार यांनी हे आरोप फेटाळून लावले. ते म्हणाले, ‘‘ निवडणुका आल्या की असे आरोप होत असतात. पंधरा वर्षांचा अर्थसंकल्प काढला तरी तितकी रक्कम होणार नाही. त्यामुळे जबाबदार पक्षाच्या जबाबदार अध्यक्षांनी जनतेला वस्तुस्थिती सांगितली पाहिजे.’’
द्रुतगती मार्गाची २०१९ मधील निविदा काढल्याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आरोपही त्यांनी फेटाळला. त्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. ‘इन्फ्रा’ची मान्यता असल्याशिवाय अशी कोणतीही कामे करता येत नाहीत.
बबनराव पाचपुते यांनी केलेल्या आरोपांविषयी अजित पवार म्हणाले, ‘‘पक्षातून कुणी बाहेर गेल्यानंतर काही प्रमाणात नुकसान होते, पण निवडणुका आल्यावर अशा घटना घडत असतात. पक्षातून बाहेर पडायचे असल्याने काहीतरी आरोप करावेच लागतात. त्यामुळे अशा मंडळींना कुणाचे तरी नाव घेऊन बाहेर पडावे लागते.’’