मुख्यमंत्री निर्णय घेत नाहीत, काँग्रेसच्या खात्यापेक्षा राष्ट्रवादीकडील खात्यात लवकर कामे होतात, असा सूर आळवणारे आणि राष्ट्रवादीचे प्राबल्य असलेल्या पिंपरी महापालिकेतील प्रलंबित प्रश्नांबाबत मुख्यमंत्री गंभीर नसल्याची तक्रार करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रदीर्घ पाठपुराव्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. िपपरी-चिंचवडचे राजकीय भवितव्य ठरवणारे विषय बैठकीत असल्याने त्याकडे सर्वाचेच लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांमध्ये असलेले ‘मधुर’ संबंध सर्वश्रुत आहेत. पिंपरीतील अनेक प्रलंबित प्रश्नांवरून दोघांमध्ये वेळोवेळी संघर्ष झाला आहे. आश्वासने देऊनही पिंपरीतील प्रश्न मार्गी न लागल्याने त्याचा फटका लोकसभेत बसला. त्याचे खापर मुख्यमंत्र्यांवर फोडण्याचा प्रयत्न झाला होता. पराभवाची पुनरावृत्ती विधानसभेत होऊ नये, यासाठी अजितदादांनी कंबर कसली आहे. पिंपरी-चिंचवडच्या प्रश्नांसाठी तातडीने बैठक घ्यावी, असे पत्र अजितदादांनी मुख्यमंत्र्यांना दिले होते. त्यानुसार, त्यांनी बराच पाठपुरावा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी दुपारी सह्य़ाद्रीवर बैठक लावली आहे.
 
बैठकीतील विषय
सांगवी-किवळे रस्त्यासाठी औंध रुग्णालयाची जागा देणे, आंद्रा व भामा आसखेड धरणातून पाणी उचलणे, २४ तास पाणीपुरवठय़ास मान्यता देणे, पिंपरी पालिकेचा समावेश ‘ब’ वर्गात करणे, रिक्त पदांची नियुक्ती, पीएमपीएल बसखरेदी हे विषय बैठकीच्या विषयपत्रिकेवर आहेत. तर, आमदार व महापालिका पदाधिकाऱ्यांनी अनधिकृत बांधकाम, शास्तीकर, एलबीटी आदी विषयांचा समावेश करण्याची विनंती केल्याने त्यांचाही समावेश होऊ शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा