लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातून सिंचनासाठी उन्हाळी हंगामातील पहिले सिंचन आवर्तन सुरू आहे. उन्हाची तीव्रता, बाष्पीभवन, पाण्याची वाढलेली मागणी यामुळे धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. तसेच यंदा मोसमी पाऊस विलंबाने येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर धरणांमधील उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन करण्यासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक पुढील आठवड्यात होणार आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांत सध्या १४.१५ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा आहे. सध्या ग्रामीण भागासाठी उन्हाळ्यातील पहिले सिंचन आवर्तन सुरू आहे. हे आवर्तन संपण्यापूर्वी कालवा सल्लागार समितीची बैठक घेण्याचे नियोजन आहे. त्यानुसार पुढील आठवड्यात ही बैठक होणार आहे. या बैठकीत शहर आणि ग्रामीण भागाला करायच्या पाणीपुरवठ्याबाबत निर्णय होणार आहे.
आणखी वाचा- पिंपरी: आमदार महेश लांडगे यांच्याकडे ३० लाखांच्या खंडणीची मागणी
गेल्या वर्षी पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाल्याने चारही धरणांत १०० टक्के पाणीसाठा होता. मात्र, महापालिकेकडून मापदंडापेक्षा जास्त पाण्याचा वापर होत असून पाणी चोरी, गळती अद्याप सुरूच आहे. १ मार्चपासून सिंचनासाठी पहिले आवर्तन सोडण्यास सुरुवात झाली आहे. ५५ दिवस हे आवर्तन सोडण्यात येणार असून त्यानंतर कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत केलेल्या नियोजनानुसार दुसरे उन्हाळी आवर्तन घेण्यात येणार आहे.
दरम्यान, उन्हाची तीव्रता वाढल्याने पाण्याचे बाष्पीभवन होत असताना मागील दोन-तीन वर्षांचा अंदाज पाहता यंदाही मान्सून उशिरा सक्रीय होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे जुलै महिन्यापर्यंत पाण्याचे नियोजन करताना महापालिकेसह जलसंपदा विभागाल कसरत करावी लागणार आहे. तत्पूर्वी उन्हाळी आवर्तनाच्या दुसऱ्या टप्प्याचे नियोजन आणि पाणीकपात याबाबत कालवा सल्लागार समितीची बैठक महत्त्वाची असून पाण्याच्या यक्ष प्रश्नावर काय तोडगा निघणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
धरणांमधील पाणीसाठा टीएमसी
सद्य:स्थितीत खडकवासला धरणात १.०४ (५३.५१), पानशेत ४.६६ (४३.७९), वरसगाव ७.९६ (६२.०७), टेमघर धरणात ०.३४ (९.११) असा एकूण १४.१५ टीएमसी म्हणजेच ४८.५४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या ५ एप्रिल रोजी चारही धरणात मिळून एकूण १३.९३ टीएमसी म्हणजे ४७.७७ टक्के पाणीसाठा होता.
१ मार्चपासून उन्हाळी आवर्तनाचा पहिला टप्पा सुरू करण्यात आला आहे. ५५ दिवस आवर्तन सुरू राहणार असून दुसऱ्या आवर्तनाचे नियोजन आहे. उन्हाची तीव्रता, बाष्पीभवन, पाणीगळती आणि प्रमाणापेक्षा जास्त पाणीवापर यामुळे धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. यंदा मोसमी पाऊस विलंबाने येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे महापालिकेला पाण्याचा सुयोग्य आणि काटकसरीने वापर करण्याबाबत नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. उन्हाळी आवर्तनाचा दुसरा टप्पा सुरू करण्यापूर्वी कालवा सल्लागार समितीची बैठक होईल. या बैठकीत पाण्याचे नियोजन करण्यात येईल. -विजय पाटील, कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे प्रकल्प