पुणे मेट्रोचा रखडलेला प्रकल्प मार्गी लागावा यासाठी बुधवारी (९ सप्टेंबर) दिल्लीत दोन बैठका होत असून शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी, तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे लोकप्रतिनिधी केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांची भेट घेणार आहेत.
पुणे मेट्रो प्रकल्प तसेच रिंग रोड आणि शहराशी संबंधित अन्य विकासकामांसंबंधी बुधवारी (९ सप्टेंबर) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्लीत बैठक बोलावली आहे. महापौर, तसेच खासदार व शहरातील सर्व आमदारांना आणि भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना या बैठकीला बोलावण्यात आले आहे. खासदार अनिल शिरोळे, पालकमंत्री गिरीश बापट, गटनेता गणेश बीडकर तसेच पक्षाचे आमदार या बैठकीत उपस्थित असतील. दुपारी साडेबारा वाजता महाराष्ट्र सदनात ही बैठक होणार आहे. पुणे मेट्रो प्रकल्प, रिंग रोड तसेच शहराशी संबंधित रस्त्यांच्या अन्य विषयांबाबत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, पालकमंत्री बापट, खासदार शिरोळे यांनी पाठपुरावा केला होता.
या बैठकीची माहिती समजल्यानंतर राष्ट्रवादीने केंद्रीयमंत्री नायडू यांची भेट सकाळी आठ वाजता मिळवली असून पुणे मेट्रोबाबत या भेटीत चर्चा केली जाणार आहे. महापौर दत्तात्रय धनकवडे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तसेच अजित पवार, खासदार वंदना चव्हाण, सुप्रिया सुळे, सभागृहनेता शंकर केमसे यांची या वेळी प्रमुख उपस्थिती असेल. स्मार्ट सिटीसाठी राज्य शासनाने पुणे आणि पिंपरीचा समावेश एकत्र केल्यामुळे केंद्राच्या अंतिम यादीतून पिंपरीला वगळण्यात आले आहे. केंद्राकडून पिंपरीचाही समावेश स्मार्ट सिटीत झाला पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादीकडून नायडू यांच्याकडे केली जाणार आहे.
महापौर, खासदार, आमदार आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांची गडकरी यांच्यासमवेत बैठक झाल्यानंतर हे सर्व पदाधिकारी गडकरी यांच्या नेतृत्वाखाली मेट्रोच्या प्रकल्पाला मंजुरी मिळावी यासाठी व्यंकय्या नायडू यांची भेट घेणार आहेत.
शहराशी संबंधित विषयांवर दिल्लीत होत असलेल्या बैठकांमधून काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे त्या पक्षांनी या निर्णयाबाबत नापसंती व्यक्त केली आहे. वास्तविक दिल्लीत पुणे शहराच्या विकासकामांसंबंधीच चर्चा होणार आहे. त्यासाठी ज्या बैठका होणार आहेत त्या बैठकांना सर्व पक्षांच्या गटनेत्यांना बोलवायला हवे होते. मात्र सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी व भाजपने या विषयातही राजकारण केले आहे. शहरविकासाच्या योजनांना आमचा पाठिंबाच आहे. त्यात कोणीही राजकारण करू नये, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेता व काँग्रेसचे गटनेता अरविंद शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

Story img Loader