मेंदी काढणे या पारंपरिक कला प्रकाराला आता ग्लॅमर मिळू लागले आहे. शहरात आता मेंदी स्टुडिओजचा नवा व्यवसाय रुजू लागला असून या व्यवसायाचे पुण्यातील वार्षिक उत्पन्न तब्बल ५ कोटी रुपयांच्या घरात पोहोचले आहे.
लग्न समारंभ, सणवार या वेळी हातावर मेंदी काढणे हा पारंपरिक कला प्रकार. कुंपणावरचा मेंदीचा पाला वाटून त्याने हात रंगवण्यापासून ते आता अरेबिक मेंदी, मेंदी टॅटू पर्यंत मेहंदीचा प्रवास झाला. लग्न समारंभांमध्ये हातावर मेंदीची नक्षी काढण्याला तर विशेष महत्त्व..
लग्न सराईचे दिवस, सणसमारंभ या दिवसांमध्ये या स्टुडिओजमध्ये अधिक गर्दी असते. या स्टुडिओजमध्ये अरेबिक मेंदी, राजस्थानी मेंदी, मुघलाई मेंदी, वधूसाठी मेंदी यांबरोबरच ग्लिटर मेंदी, मेंदी टॅटू असे प्रकार काढले जातात. या कालावधीत दिवसाला ५० ते ६० ग्राहक पार्लरला भेट देतात. एरवीही दिवसाला सरासरी २० ग्राहक मेंदी स्टुडिओला भेट देत असल्याचे शिवा मेंदी आर्ट स्टुडिओतील कर्मचाऱ्यांनी सांगितले. प्रत्येक हातासाठी किमान शंभर रुपयांपासून ते पाच हजार रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाते. मेंदीच्या नक्षी आणि प्रकारानुसार शुल्क ठरते. लग्नाची मेंदी काढण्यासाठी आवर्जून स्टुडिओजला प्राधान्य दिले जात आहे. लग्न समारंभांसाठी ‘मेंदी सोहळ्याचे आयोजनही या स्टुडिओजकडून केले जाते. त्याशिवाय इतर वेळीही केवळ आवड म्हणून मेंदी काढण्यासाठी या स्टुडिओजमध्ये जाणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. या हौशी ग्राहकांसाठी अगदी रात्री साडेदहा वाजेपर्यंत मेंदी स्टुडिओज सुरू असतात. फिरायला येणाऱ्या परदेशी नागरिकांकडूनही या मेंदी स्टुडिओजना आवर्जून भेट दिली जात असल्याचे स्टुडिओजमध्ये काम करणारे कर्मचारी सांगतात. सध्या साधारणपणे एका मेंदी स्टुडिओमध्ये किमान चार ते पाच कर्मचारी काम करतात. विशेष म्हणजे या स्टुडिओजमध्ये काम करणाऱ्यांमध्ये मुलांची संख्या जास्त आहे. कोणत्याही शैक्षणिक पात्रतेची अट न ठेवता, केवळ सौंदर्यदृष्टी आणि अंगभूत कला यांच्या आधारे मेंदी स्टुडिओजनी अनेकांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून दिले आहे.
पुण्यात मेंदी स्टुडिओजची क्रेझ
शहरात आता मेंदी स्टुडिओजचा नवा व्यवसाय रुजू लागला असून या व्यवसायाचे पुण्यातील वार्षिक उत्पन्न तब्बल ५ कोटी रुपयांच्या घरात पोहोचले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 25-04-2014 at 03:20 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mehndi studio art parlour