लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी : क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेने बनविलेले क्रांतिवीर चापेकर बंधुंचे स्मारक हे देशासाठी प्रेरणास्थळ आहे. या स्मारकामुळे नव्या पिढीला चापेकरांचे कार्य, इतिहास माहिती होईल, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.
क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या सुवर्ण महोत्सवाचा सांगता समारंभ राज्यपाल बैस यांच्या उपस्थितीत मंगळवारी चिंचवड येथे झाला. समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे, आमदार महेश लांडगे, उमा खापरे, अश्विनी जगताप, आयुक्त शेखर सिंह, मिलिंद देशपांडे, डॉ. अशोक नगरकर, ॲड. सतीश गोरडे, रवी नामदे यावेळी उपस्थित होते.
आणखी वाचा-पुण्यातील वाहतुकीला लागणार शिस्त! बेशिस्त वाहनचालकांच्या परवान्यावर ‘फुली’
राज्यपाल बैस म्हणाले, पुनरुत्थान समरसता गुरुकुलम मध्ये पारधी समाजातील ३५० विद्यार्थ्यांची देखभाल केली जात आहे. विद्यार्थ्यांना संगणक, गणपतीच्या मूर्ती, कंदील, पणत्या, सुतारकाम अशा विविध प्रकारचे कौशल्यावर आधारित शिक्षणही दिले जाते. कुशल मनुष्यबळाची मागणी पूर्ण करण्यासाठी जगातील विविध देश भारताकडे आशेने बघत आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण दिले पाहिजे. युवकांना उद्योजक बनण्यासाठी प्रेरित केले पाहिजे. तरच भटक्या-विमुक्त समाजातील युवक आत्मनिर्भर बनतील. त्यांच्या कुटुबीयांचा जीवनस्तर उंचावेल.
शिक्षण, महिला सशक्तीकरण, भटक्या-विमुक्त जातीच्या विकासासाठी चापेकर स्मारक समिती काम करत आहे. आदिवासी, भटक्या जाती जमातीतील लोकांना शिक्षित करण्यासाठी आवश्यक कौशल्य प्रदान करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.