क्रांतिवीर चापेकर यांच्या चिंचवडगावातील रखडलेल्या समूहशिल्पाचे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल आणि ते स्मारक दर्जेदार व प्रेरणादायी ठरेल, अशी ग्वाही पिंपरीच्या महापौर मोहिनी लांडे यांनी गुरुवारी दिली.
क्रांतिवीर दामोदर चापेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त पिंपरी पालिकेच्या वतीने चापेकरवाडा येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या वेळी माजी महापौर अपर्णा डोके, प्रभाग अध्यक्षा यमुना पवार, सुरेखा गव्हाणे, नगरसेवक अश्विनी चिंचवडे, संदीप चिंचवडे, अनंत कोऱ्हाळे, चापेकर स्मारक समितीचे प्रमुख गिरीश प्रभुणे आदी उपस्थित होते.
महापौर म्हणाल्या, चिंचवडगावात उड्डाणपूल उभारल्यानंतर चौकातील क्रांतिवीर चापेकर यांचा पुतळा हलवण्यात आला व पर्यायी जागेवर स्मारक उभारण्याचा निर्णय झाला होता. पूल जसजसा तयार होऊ लागला, तसे नियोजित पुतळ्यांची उंची खूपच कमी असल्याचे दिसू लागले. त्यात बदल करून पुतळ्यांची उंची वाढवण्याचा निर्णय झाला. याबाबत आवश्यक ती कार्यवाही तातडीने करून स्मारकाचे काम पूर्ण करण्यात येईल, असे महापौरांनी नमूद केले.