मोबाइलमधील अश्लील चित्रफित दाखवून नऊ वर्षांच्या बालिकेवर बलात्कार केल्याप्रकरणी एकास विशेष न्यायाधीश श्रीपदा पोंक्षे यांनी वीस वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. या खटल्यात डीएनए चाचणी तसेच बालिकेची साक्ष महत्त्वाची ठरली. साक्ष तसेच पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली.
खाऊच्या बहाण्याने बालिकेला घरात बोलवले
पवन उर्फ प्रणव नरसिंह कुडाळकर (वय २०, रा. जेजुरी, जि. पुणे) असे आरोपीचे नाव आहे. ७ जानेवारी २०१८ रोजी बालिका घराबाहेर खेळत होती. आरोपी कुडाळकरने बालिकेला दहा रुपये देऊन खाऊ आणण्यास सांगितले. त्यानंतर कुडाळकरने बालिकेला घरात नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. बालिकेला मोबाइलमधील अश्लील चित्रफित दाखविली. या घटनेची माहिती बालिकेने आईला दिली. त्यानंतर तिच्या आईने जेजुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या खटल्यात सरकार पक्षाकडून विशेष सरकारी वकील अरुंधती रासकर यांनी बाजू मांडली. सरकार पक्षाकडून १३ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. साक्ष तसेच ग्राह्य धरून न्यायालयाने कुडाळकरला वीस वर्ष सक्तमजुरी आणि ७५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
या प्रकरणाचा तपास उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब जाधव, जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर, उपनिरीक्षक गीतपागर यांनी केला. न्यायालयीन कामकाजासाठी सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील, सहायक फौजदार विद्याधर निचित, एम. डी. भोसले यांनी सहाय्य केले.