पुणे : पुण्यासारख्या महानगरात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी पुरुष पुढे येत नसल्याचे चित्र आहे. या वर्षभरात एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत पुण्यात ५ हजार ४०८ महिलांची कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया झाली असून, ही शस्त्रक्रिया करणाऱ्या पुरुषांची संख्या केवळ २३७ आहे.

महापालिकेच्या आरोग्य विभागाचे एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ साठी १२ हजार ६२ महिलांच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट होते. त्यांपैकी ६७ टक्के उद्दिष्ट गाठण्यात यश आले आणि ८ हजार १६५ महिलांची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झाली. याच कालावधीसाठी १ हजार ९५ पुरुषांच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट होते. त्यांपैकी २३ टक्के म्हणजेच २५४ जणांची शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर आरोग्य विभागाचे एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीसाठी १३ हजार २०० महिलांच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट होते. त्यांपैकी ७४ टक्के म्हणजेच ९ हजार ७१३ जणांची शस्त्रक्रिया झाली. याच कालावधीसाठी १ हजार १०० पुरुषांच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट होते. त्यांपैकी ३१ टक्के म्हणजेच ३४८ जणांची शस्त्रक्रिया झाली.
गेल्या काही वर्षांत कुटुंब नियोजन करणाऱ्या पुरुषांची संख्या फारशी वाढत नसल्याचे या आकडेवारीतून समोर आले आहे. कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांमध्ये महिलांच्या तुलनेत पुरुषांचे प्रमाण केवळ ३ टक्के आहे.

हेही वाचा – पुणे: वाहतूक पोलिसांच्या कारवाईत खून प्रकरणातील आरोपीचा शोध

पुरुषांची संख्या कमी का?

  • कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेबाबत अपुरी माहिती
  • शस्त्रक्रियेनंतर लैंगिक क्षमता कमी होते, असा गैरसमज
  • पुरुषांची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया हास्याचा विषय बनल्याचा फटका
  • सरकारी पातळीवर जनजागृती करण्यात अपयश
  • स्वयंसेवी संस्थांनाही शस्त्रक्रियायोग्य पुरुषांपर्यंत पोहोचण्यात अडचणी

पुण्यातील कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया

कालावधी – महिला – पुरुष

एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ – ८,१५६ – २५४

एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ – ९,७१३ – ३४८

एप्रिल ते नोव्हेंबर २०२४ – ५,४०८ – २३७

हेही वाचा – पिंपरी : आकुर्डी रेल्वे स्थानक येथे ‘बोगी – वोगी’ रेस्टॉरंट

पुरुषांच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेबाबत समाजात अनेक गैरसमज आहेत. दुसरीकडे, महिलांची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याच्या आरोग्य सुविधा सहजपणे उपलब्ध आहेत. पुरुषांना अशा शस्त्रक्रिया कुठे करायच्या, याची फारशी माहिती नसते. पुण्यासारख्या शहरात पुरुष कर्मचाऱ्यांमध्ये कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांबाबत जनजागृती करण्यासाठी आमच्यासारख्या संस्थांसाठी कंपन्यांनी दारे खुली करावीत. – डॉ. प्रवीण सोनावणे, पुणे शाखाप्रमुख, फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया

Story img Loader