स्वमदत गटाच्या बैठकांमधील निरीक्षण
मानसिक आजारांवर वैद्यकीय उपचार टाळून आधी अंधश्रद्धांचा आधार घेऊ पाहणे हे केवळ ग्रामीण भागातच नव्हे तर शहरी भागातील सुशिक्षित लोकांमध्येही दिसून येत आहे. ‘ना-ना उपायांमध्ये हेही करून पाहू,’ अशी अनेक मानसिक रुग्णांच्या हतबल पालकांची मानसिकता असल्याचे निरीक्षण ‘सा’ (स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन) या संस्थेच्या स्वमदत गटाच्या बैठकांमध्ये बघायला मिळाले.
संस्थेच्या उपाध्यक्ष नीलिमा बापट म्हणाल्या, ‘‘मानसिक आजारांविषयी गैरसमजुती बऱ्याच असून देवाचा कोप किंवा भूतबाधा अशा कारणांमुळे आजार झाल्याची समजूत केवळ ग्रामीण भागातच नव्हे तर सुशिक्षित लोकांमध्येही दिसते. ज्योतिषांना विचारून तोडगे करणे, मंत्र-तंत्र, जपजाप्य या सर्व गोष्टी पालक करतात. आपल्या घरातील व्यक्तीच्या मानसिक आजाराने नातेवाईक निराश व असहाय्य झालेले असतात. ‘फारसे पटत नसले तरी एकदा करून पाहण्यास काय हरकत आहे,’ असे त्यांना वाटत असते. अशा उपायांमध्ये बराच खर्च झाल्यावर आजाराची लक्षणे कमी झाली नसल्याचे दिसून येते. स्वमदत गटात आम्ही रुग्णाला नेमका त्रास काय होतो, लक्षणे, डॉक्टरांचा सल्ला घेतला का की दुसरे काही उपाय केले हे सगळे विचारतो. आम्ही डॉक्टर नसल्यामुळे निदान करू शकत नाही, परंतु लवकरात लवकर मानसिक आजारासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे कसे गरजेचे आहे, औषधांनी स्थिती सुधारू शकेल, हे पटवून देतो.’’
गटाच्या बैठकीत आलेल्या सर्वच नातेवाईकांच्या घरी एकाच स्वरूपाच्या समस्या असतात. त्यामुळे इतरांचे पाहून ते आपल्या घरातील रुग्णाविषयी मोकळेपणे बोलू शकतात, असेही बापट यांनी सांगितले. त्या म्हणाल्या,‘‘आपली उच्च शिक्षित मुले-मुली अचानक काम सोडून बसून राहू लागली, मानसिक आजारामुळे त्यांची त्यांच्या कामातील कौशल्ये कमी झाली, पिढय़ान्पिढय़ा विद्वान मंडळी असलेल्या घरात मानसिक आजार येऊच कसा शकेल, हे सारे पालकांना स्वीकारणे जड जाते. मानसिक आजाराचा संबंध बुद्धीशी वा शिक्षणाशी नसतो हेही त्यांना पटवून द्यावे लागते.’’
स्वमदत गटात सहभागी होण्यासाठी नोंदणी करावी लागत नाही. तसेच शुल्काची सक्ती नसून ते ऐच्छिक असते. स्वमदत गटात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नातेवाईकांनी ०२०-६४७००९२०, २४३९१२०२ या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा, असे संस्थेतर्फे सांगण्यात आले.
गटाच्या बैठका कधी?
- डॉ. नीतू इंडियन मेडिकल असोसिएशन- तिसरा शनिवार
- धायरीतील संस्थेचे कार्यालय- दुसरा व चौथा शनिवार
- पिंपरीतील वायसीएम रुग्णालयाचा मानसोपचार विभाग- पहिला व तिसरा शनिवार