पुणे : भारतीय जनता पक्षाचे खासदार अनुराग ठाकूर यांनी बुधवारी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यावर हल्ला चढवला. देशातील आरक्षण संपवणे हीच काँग्रेसची मानसिकता आहे. पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांची मानसिकता आरक्षण संपवण्याचीच होती. आता विदेशी भूमीवर राहुल गांधी यांच्या तोंडून आरक्षण संपवण्याची भाषा बोलली गेली आहे, अशा शब्दांत त्यांनी टीका केली.

विकसित भारत कार्यक्रमासाठी ठाकूर पुणे दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली भ्रष्टाचार मुक्त सरकारमुळे जगात १४० कोटी भारतीयांचा मान-सन्मान वाढत असल्याचे देश पाहात आहे. भारत जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वांत अर्थव्यवस्थेचा देश झाला आणि पुढील दोन वर्षांत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होणार आहे. दुसरीकडे त्यांच्या कुटुंबाच्या पक्षाने साठ वर्षे देशावर राज्य करून, देशाची वाईट स्थिती करून आता परदेशात जाऊन भारताची प्रतिमेला धक्का देत आहेत, खोटे बोलत आहेत. देशाची बदनामी होईल असा अपप्रचार करत आहेत. देशात अपमान कोण करत आहे आणि सन्मान कोण करत आहे, हे देशवासियांना माहीत आहे. मोदी यांनी देशाचा मान वाढवल्यामुळेच ते देशवासियांच्या मनात आहेत, तर काहींनी भारतीयांचा अपमान केल्यामुळे ते भारताचे आहेत की पाकिस्तानचे असा प्रश्न जगाकडून विचारला जात आहे, असे ठाकूर यांनी सांगितले.

हे ही वाचा…अकोला :‘लाडक्या बहीण’च्या लाभासाठी चक्क भाऊ रांगेत; वाचा नेमकं घडल काय?

राहुल गांधी यांनी शिखांविषयी केलेल्या वक्तव्याबाबत ठाकूर म्हणाले, की राहुल गांधी यांनी शिखांविषयी अपप्रचार केला आहे. राजीव गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली शिखांचे शिरकाण झाले. आता राहुल गांधी विदेशात देऊन देशाची बदनामी करत आहेत. शिखांना न्याय देण्यासाठी मोदी सरकारने विशेष चौकशी समिती (एसआयटी) नियुक्त केली. कर्तारपूर कॉरिडॉरद्वारे गुरुद्वाराचे दर्शन सुरू केला. वीर बाल दिवस, गुरु नानक देव यांचा ५०० वा प्रकाशोत्सव दिवस, गुरू तेगबहादूर यांचा ४०० वा प्रकाशोत्सव मोदी सरकारनेच साजरा केला. त्यामुळे काँग्रेसने शिखांचे अपमान आणि शिरकाण केले, तर नरेंद्र मोदी सरकारने शिखांना मान दिल्याचे त्यांनी नमूद केले.

हे ही वाचा…अमरावती : “आम्हाला शिकवू द्या, शाळा बनल्या उपक्रमांच्या प्रयोगशाळा”; शिक्षकांचा उस्फूर्त मोर्चा

काँग्रेस सरकारकडून कर्नाटकमध्ये पुन्हा लूट सुरू

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. निष्पक्ष चौकशी होण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्या पदावर असताच कामा नये. कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आल्यापासून लोकांना लुटण्याचे काम पुन्हा सुरू झाल्याची टीका ठाकूर यांनी केली.