पुण्यातल्या चाकण भागात असलेल्या वात्सल्य शिक्षण संस्थेत शिक्षकांनी एका गतिमंद मुलीला मारहाण करून चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दिली आहे. या घटनेप्रकरणी शिक्षक विलास देवतरसे, वैशाली देवतरसे आणि शाळेचे केअर टेकर रेवन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकणच्या वात्सल्य शिक्षण संस्थेत चिंचवड येथे राहणारी १६ वर्षीय गतिमंद मुलगी शिक्षण घेत होती.तसेच तिचे तेथील व्यक्ती संगोपन करत होते. मागील काही महिन्यांपासून ती तिथे शिक्षण घेत होती. ३८ वर्षीय आई आपल्या मुलीला भेटण्यासाठी चिंचवड येथून चाकण ला जात असत.परंतु, प्रत्येक वेळी तिच्या अंगावर वेगवेगळ्या जखमा दिसत होत्या अस फिर्यादीत म्हटलं आहे.त्यामुळे आईने चाकण पोलीस ठाण्यात संबंधित शिक्षकांविरोधात फिर्याद दिली आहे.१६ वर्षीय गतिमंद मुलीचे हातपाय बांधून ठेवले जायचे एवढेच नाही तर चटके देखील देत असत,डोक्यात हात,पायावर आणि कपाळावर मारहाण झाल्याचे देखील फिर्यादीत म्हटले आहे.तर मुलीला जेवणातून आणि पाण्यातून झोपेचं औषध देऊन तिचा वेळोवेळी शारीरिक छळ झाल्याचे चाकण पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कटोरे हे करत आहेत.
दरम्यान मुलीच्या आईने दिलेली तक्रार खोटी आहे, संस्थेकडे संबंधित व्यक्तींनी पैश्यांची मागणी केली होती.पैसे मागितल्याची आमच्याकडे मोबाईल रेकॉर्डिंग आहे.मुलीला झालेली मारहाण ही त्यांच्या घरी झाली असून संस्थेत झालेली नाही.आम्ही त्यांच्या विरोधात तक्रार देणार आहोत. असे शिक्षक विलास देवतरसे यांनी सांगितले आहे.