लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : ‘दौंड तालुक्यातील कुरकुंभमधून ४०० कोटी रुपयांची मेफेड्रोनची तस्करी लंडनमध्ये केलेल्या प्रकरणाचा केंद्रीय गुन्हे अन्वेषण शाखेकडून (सीबीआय) समांतर तपास करण्यात येत असून, या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार संदीप धुनिया व्हिएतनामध्ये वास्तव्यास असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे,’ अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
कुरकुंभ मेफेड्रोन तस्करी प्रकरणाचा नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोकडून (एनसीबी) तपास करण्यात येत आहे. तसेच, ‘सीबीआय’कडूनही सखोल तपास केला जात आहे. या प्रकरणात दिल्लीतून अटक करण्यात आलेला आरोपी संदीप यादव याने कुरिअरद्वारे ४०० कोटी रुपयांचे २१८ किलो मेफेड्रोन लंडनला पाठविले होते. यादव याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
या प्रकरणात गुंड वैभव उर्फ पिंट्या माने, हैदर शेख, अजय करोसिया, भीमाजी साबळे, युवराज भुजबळ, आयूूब मकानदार, संदीपकुमार बसोया, दिवेश भुटानी, संदीप यादव, देवेंद्र यादव, सुनीलचंद्र बम्रन, मोहम्मद कुरेशी, शोएब शेख, सिनथिया उगबाब, अंकिता दास, निशांत मोदी यांच्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
कुरकुंभ परिसतील कारखान्यात छापा टाकून पोलिसांनी एक हजार ८३६ किलो मेफेड्रोन जप्त केले होते. आंतराष्ट्रीय बाजारपेठेत जप्त केलेल्या मेफेड्रोनची किंमत तीन हजार ६७४ कोटी रुपये आहे. मेफेड्रोन विक्री प्रकरणात पुणे पोलसांच्या गुन्हे शाखेने सोमवार पेठेतील गुंड वैभव उर्फ पिंट्या माने, हैदर शेख यांना पकडले होते. त्यांच्याकडे करण्यात आलेल्या चौकशीत मेफेड्रोन कुरकुंभ ओैद्यौगिक वसाहतीतील अर्थकेम लॅबोरटरीजमध्ये तयार करण्यात आल्याचे उघडकीस आले होते.
तेथून दिल्लीसह देशातील वेगवेगळ्या शहरात आणि लंडनमध्ये मेफेड्रोन विक्रीस पाठविण्यात आल्याचे उघडकीस आले होते. मेफेड्रोन तस्करी प्रकरणाचा मुख्य सूत्रधार संदीप धुनिया असल्याचे उघडकीस आल्यानंतर तो परदेशात पसार झाला होता. धुनिया हा व्हिएतनामध्ये वास्तव्यास असल्याचे उघडकीस आले आहे.
कुरकुंभमधील मेफेड्रोन एप्रिलमध्ये नष्ट
कुरकुंभमध्ये जप्त करण्यात आलेले मेफेड्रोन नष्ट करण्यात येणार आहे. ही कारवाई पोलिसांनी केली असल्याने मेफेड्रोन नष्ट करण्याची प्रक्रिया पुण्यात करण्यात यावी, असे पत्र पुणे पोलिसांनी ‘एनसीबी’ला नुकतेच दिले.