पुणे : अमली पदार्थ तस्कर ललित पाटील मुख्य आरोपी असलेल्या चाकणमधील मेफेड्रोन विक्री प्रकरणातील खटल्याच्या सुनावणीला खेड़ न्यायालयात सुरुवात झाली असून, तत्कालीन अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस अधिकारी शाकीर कौसुद्दीन जेनेरी यांनी न्यायालयात आरोपींना ओळखले. मीच ७ ऑक्टोबर २०२० रोजी चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचे त्यांनी न्यायालयात सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खेड़ येथील विशेष न्यायाधीश अश्रफ घनवाल यांच्या न्यायालयात विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी शाकीर कौसुद्दीन जेनेरी यांची साक्ष नोंदविली. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने खेड तालुक्यात ७ ऑक्टोबर २०२० रोजी २० किलो मेफेड्रोन (एमडी) जप्त केले होते. तपासात आरोपींनी रांजणगाव येथील कंपनीत तब्बल १३२ किलो आणि रायगड जिल्ह्यातील महाड येथे दहा-पंधरा किलो मेफेड्रोन तयार केल्याची माहिती मिळाली होती. या प्रकरणात पोलिसांनी अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलसह एकूण २० जणांना अटक करून गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यात ललित पाटील ससून रुग्णालयात उपचार घेत असताना मेफेड्रोनची विक्री करत असल्याचे उघडकीस आले होते. पोलिसांनी आरोपींविरुद्ध २८ सप्टेंबर २०२१ रोजी खेड सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. याप्रकरणात आठ आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. उर्वरित बारा आरोपी येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.

हेही वाचा >>>लोणावळा नगर परिषदेकडून जलप्रदूषण! सांडपाणी थेट नद्यांत सोडल्याचा धक्कादायक प्रकार

या खटल्याच्या सुनावणीमध्ये ॲड़ हिरे यांनी न्यायालयात युक्तिवाद केला की, तक्रारदार पोलीस अधिकारी यांनी आरोपी ललित पाटील याच्याकडून जो २० किलोचा अमली पदार्थ जप्त केला त्याचा सविस्तर पंचनामा करून गुन्हा दाखल केला आहे. त्याबाबतचे पुरावे देखील त्यांनी न्यायालयात सादर केले आहेत. २० किलो मेफ़ेड्रॉन हे वेगवेगळ्या पिशवीत आढळले होते. त्यातील दोन दोन किलोच्या बॅगा चौघांकडून जप्त करून त्यातील अमली पदार्थ राष्ट्रीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या गुन्ह्यात तक्रारदार यांची साक्ष महत्वपूर्ण ठरणार आहे. दरम्यान, यावेळी आरोपींचे वकील देखील न्यायालयात हजर होते.