लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : मेफेड्रोनची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या सराइताला फरासखाना पोलिसांनी गणेश पेठ परिसरातून अटक केली. त्याच्याकडून पाच लाख ८८ हजारांचे २९ ग्रॅम मेफेड्रोन जप्त केले.

अझहर उर्फ बडे सय्यद (रा. नाडे गल्ली, गणेश पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. अमली पदार्थ तस्कर, तसेच विक्री करणाऱ्यांविरुद्ध पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. गणेश पेठेतील नाडे गल्लीत सोमवारी (२५ मार्च) मध्यरात्री दोनच्या सुमारास सय्यद मेफेड्रोनची विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलीस हवालदार महेश राठोड आणि समीर माळवदकर यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. त्याच्याकडून पाच लाख ८८ हजारांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले. सय्यद याने मेफेड्रोन कोणाकडून आणले, तसेच कोणाला विक्री करणार होता, यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल, सहायक आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, गुन्हे शाखेचे निरीक्षक अजित जाधव, सहायक वैभव गायकवाड, उपनिरीक्षक अरविंद शिंदे, मेहबूब मोकाशी, तानाजी नागरे, गजानन सोनुने, महेश राठोड, नितीन जाधव, नितीन तेलंगे, प्रवीण पासलकर, वैभव स्वामी, सुमित खुट्टे, महेश पवार यांनी ही कारवाई केली.

येरवडा भागातून १३ किलो गांजा जप्त

येरवडा भागात गांजा विक्री प्रकरणी गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने दोघांना अटक केली. त्यांच्याकडून दोन लाख ८१ हजार रुपयांचा १३ किलो गांजा जप्त करण्यात आला. जगदीश भवानसिंग बारेला (वय १८, रा. दहिवत, अंमळनेर, जि. जळगाव), पवन सुभाष बारेला (वय २२, रा. कलकुंटी, जि. बरवानी, मध्य प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. बारेला येरवड्यात गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी संदीप शेळके यांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून दाेघांना पकडले. त्यांच्याकडून १३ किलो गांजा जप्त करण्यात आला.

दरम्यान, लष्कर पोलीस ठाण्यात अमली पदार्थ विक्री प्रकरणात दाखल गुन्ह्यात पसार असलेल्या आरोपीला अमली पदार्थ विरोधी पथकाने कोंढवा परिसरातून अटक केली. नदीम मेमन उर्फ इब्राहिम अल्ताफ कच्छी (वय २५, रा. भागोदयनगर, कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहायक निरीक्षक नितीनकुमार नाईक, संदीप शेळके, साहिल शेख, प्रशांत बोमादंडी, संदीप जाधव, रवींद्र रोकडे, मयूर सूर्यवंशी यांनी ही कामगिरी केली.