पुणे : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मर्सिडीज बेंझ कंपनीला पाठविलेल्या नोटिशीला कंपनीने आठवडाभरातच उत्तर दिले आहे. पर्यावरण नियमांचे पालन करण्यासाठी कंपनीकडून मंडळाने २५ लाख रुपयांची बँक हमी घेतली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. मंडळाने कंपनीला नोटीस बजावून, पर्यावरण नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मर्सिडीज बेंझच्या चाकणमधील प्रकल्पाला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी २३ ऑगस्ट व ४ सप्टेंबरला भेट देऊन तपासणी केली होती. त्यानंतर २१ सप्टेंबरला मंडळाने कंपनीला नोटीस बजावली होती. प्रदूषण नियंत्रण नियमांचे पालन कंपनीकडून होत नाही, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील क्लॅरिफायर्स आणि सेंट्रीफ्यूज युनिट काम करीत नाहीत, डिझेल इंजिनांसाठीची उत्सर्जन नियंत्रण उपकरणे बसविण्यास सांगूनही त्याचे पालन केलेले नाही, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प योग्यरीत्या चालविला जात नाही आणि त्याची देखभालही केली जात नाही, असा ठपका कंपनीवर ठेवण्यात आला होता.

हे ही वाचा…“पंतप्रधान मोदींच्या अगाध ज्ञानाचं…”; महात्मा गांधींबाबत केलेल्या ‘त्या’ विधानावरून शरद पवारांचा टोला!

या नोटिशीला उत्तर देण्यास मर्सिडीज बेंझला १५ दिवसांची मुदत देण्यात आली होती. नोटीस बजावल्यानंतर कंपनीने आठवड्याच्या आतच, २६ सप्टेंबरला नोटिशीला उत्तर दिले. त्यात मंडळाने प्रकल्पाच्या ठिकाणी दाखविलेल्या त्रुटी दूर करून, तेथे आता नियमांचे पालन केले जात असल्याचे कंपनीने म्हटले आहे. मंडळाकडून कंपनीला संमती देताना काही अटी घातल्या जातात. या अटींचे पालन व्हावे, यासाठी कंपनीकडून बँक हमी घेतली जाते. आता नियमांचे पालन व्हावे, यासाठी मंडळाने कंपनीकडून २५ लाख रुपयांची बँक हमी घेतली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

कदम यांच्या वादग्रस्त भेटीची किनार

कंपन्या पर्यावरण नियमांचे पालन करीत आहेत का, याची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून तपासणी केली जाते. मंडळाचे अधिकारी आणि कर्मचारी ही तपासणी करतात. मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम हे २३ ऑगस्टला पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त आले होते. त्यांनी अचानक मंडळाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन मर्सिडीज बेंझच्या चाकणमधील प्रकल्पाची पाहणी केली. मर्सिडीजच्या भेटीबाबत आणि नियमांच्या उल्लंघनाबद्दल समाजमाध्यमावर पोस्ट करण्यात आली. मात्र, नंतर ती काढून टाकण्यात आल्याने या भेटीचे नेमके प्रयोजन काय होते, असा प्रश्न उपस्थित झाला होता.

हे ही वाचा…पिंपरी : चिंचवड शहरातील भाजपमधील गटबाजी उघड; इच्छुकांना डावलत विधानसभा उमेदवारीसाठी ‘या’ तिघांची नावे प्रदेशकडे

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या तपासणीत मर्सिडीज बेंझच्या चाकण प्रकल्पात पर्यावरण नियमांचे उल्लंघन आढळले होते. त्यामुळे कंपनीला नोटीस बजाविण्यात आली होती. कंपनीने या नोटिशीला उत्तर दिले असून, नियमांचे पालन करण्यात आल्याचे म्हटले आहे.- जगन्नाथ साळुंखे, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mercedes benz responded to the maharashtra pollution control board providing a 25 lakh bank guarantee pune print news stj 05 sud 02