जाचक अटी लादून आणि व्यापाऱ्यांना विश्वासात न घेता स्थानिक संस्था कराची (लोकल बॉडी टॅक्स- एलबीटी) अंमलबजावणी करू नये, अशी मागणी पुणे व्यापारी महासंघाने केली असून एलबीटीबाबत आयुक्तांबरोबर चर्चा करण्यासाठी महासंघाने मंगळवारी (१२ मार्च) व्यापारी मेळाव्याचे आयोजन केले आहे.
महासंघाचे सचिव महेंद्र पितळीया यांनी शनिवारी ही माहिती दिली. एलबीटी १ एप्रिलपासून लागू करण्यासंबंधी राज्य शासनाने अधिसूचना जारी केली असली, तरी व्यापाऱ्यांमध्ये आणि प्रशासनामध्येही त्याबाबत अद्याप संभ्रम आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने एकतर्फी पद्धतीने या कराच्या वसुलीची अंमलबजावणी करू नये, अशी महासंघाची मागणी असून त्याबाबत व्यापारी आणि महापालिका आयुक्त महेश पाठक तसेच जकात विभागाचे प्रमुख, उपायुक्त विलास कानडे यांच्या चर्चेचे आयोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
एलबीटीच्या आकारणीबाबत महापालिकेतर्फे यावेळी सादरीकरण केले जाईल, तसेच माहिती पत्रिकेचे वाटप केले जाईल व त्यानंतर प्रश्नोत्तरे होतील. बिबवेवाडी येथील यश लॉन्स येथे मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजता हा मेळावा होणार असून शहरातील ऐंशी व्यापारी संघटनांचे चार हजार प्रतिनिधी यावेळी उपस्थित राहतील, असे पितळीया यांनी सांगितले. एलबीटीची माहिती करून घेण्यासाठी तसेच पुढील धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी या मेळाव्याला व्यापाऱ्यांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन व्यापारी महासंघाचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल आणि खजिनदार फत्तेचंद रांका यांनी केले आहे.