लेखी परीक्षेतील गुणांपेक्षा कौशल्यावर आधारित गुणवत्ता महत्त्वाची आहे, त्यादृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे मत पालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी व्यक्त केले. महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या कमी होत चालली आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण व सोयीसुविधा उपलब्ध करणे आवश्यक आहे, असे आवाहन आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले.
शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी पिंपरी पालिकेच्या वतीने पिंपळे गुरव व तळवडे या ठिकाणी समारंभपूर्वक प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना आवश्यक शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. पिंपळे गुरव येथील कार्यक्रमास आमदार लक्ष्मण जगताप, आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी, मंडळाच्या उपसभापती लता ओव्हाळ, प्रशासन अधिकारी डॉ. अशोक भोसले, सदस्य शिरीष जाधव, नाना शिवले, चेतन भुजबळ, चेतन घुले आदी उपस्थित होते. तळवडे येथील कार्यक्रमास महापौर मोहिनी लांडे, अतिरिक्त आयुक्त प्रकाश कदम, सभापती विजय लोखंडे, सदस्य धनंजय भालेकर, निवृत्ती शिंदे, विष्णू नेवाळे, श्याम आगरवाल आदी उपस्थित होते.
शिक्षण मंडळाच्या वतीने पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश, बूट-मोजे, वह्य़ा, कंपासचे वाटप करण्यात आले. उर्वरित शाळांमध्ये क्रमाक्रमाने हे साहित्य दिले जाणार आहे. तथापि, रेनकोट व दप्तरांचा आजच्या वाटपात समावेश नव्हता, तेही लवकरच देऊ, असे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले.

Story img Loader