पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी गुरुवारी जाहीर करण्यात आली. त्यात विनायक पाटील यांनी राज्यात पहिला क्रमांक मिळवला. एमपीएससीने सर्वसाधारण गुणवत्ता यादी आणि संबंधित माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध केली. राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ विविध २३ संवर्गातील ६३३ पदांसाठी घेण्यात आली होती. राज्यसेवेची आतापर्यंतची सर्वाधिक पदांची भरती प्रक्रिया असल्याने राज्यभरातील उमेदवारांचे या निकालाकडे लक्ष लागले होते. एमपीएससीने जाहीर केलेल्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये धनंजय बांगर यांनी राज्यात द्वितीय, तर सौरभ गावंडे यांनी तृतीय क्रमांक मिळवला.  एकूण १८३० उमेदवारांचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> ‘स्मार्ट सिटी’चे प्रकल्प कोणी घेता का? प्रतिसाद नसल्याने मालमत्तांचे दर कमी करण्याची नामुष्की

सर्वसाधारण गुणवत्ता यादी तात्पुरत्या स्वरुपाची आहे. अर्जामधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी प्रमाणपत्रे, कागदपत्रे पडताळणी करताना काही उमेदवारांच्या दाव्यामध्ये बदल होऊ शकतो. तसेच उमेदवाराचा गुणवत्ताक्रम बदलू शकतो. न्यायालयात, न्यायाधिकरणात दाखल न्यायिक प्रकरणांतील अंतिम न्यायनिर्णयाच्या अधीन राहुन सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. परीक्षेतील पदांसाठी पसंतीक्रमाचे पर्याय सादर करण्यासाठीची प्रक्रिया २२ जानेवारीपासून सुरू करण्यात येणार आहे. अधिसूचित संवर्ग-पदांसाठी १ ते २३ यातील पसंतीक्रम निवडणाऱ्या उमेदवारांचा त्यांनी दिलेल्या पसंतीक्रमानुसार सर्व पदांवरील निवडीसाठी विचार होईल. २३ संवर्गांपैकी ज्या पदावरील निवडीसाठी इच्छुक आहे, केवळ त्याच पदासाठी पसंतीक्रम सादर करावेत. निवडीसाठी इच्छुक नसलेल्या पदासाठी नो प्रेफरन्स हा पर्याय निवडावा. पसंतीक्रम सादर केल्यानंतर त्याची पीडीएफ उमेदवाराला डाऊनलोड करून जतन करता येणार आहे. पसंतीक्रमाचे पर्याय केवळ ऑनलाइन पद्धतीनेच सादर करणे आवश्यक असून, त्यासाठीची अंतिम मुदत २९ जानेवारी आहे. या मुदतीनंतर संवर्ग, पदांचे पसंतीक्रम सादर करण्याची किंवा बदलण्याची विनंती मान्य केली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.

हेही वाचा >>> ‘फिरोदिया करंडक’ यंदा सुवर्ण महोत्सवी वर्षात

राज्यात पहिल्या आल्याचा आनंद

मी मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगरड येथील आहे. आई-वडील शेती करतात. राज्यसेवेचा माझा दुसरा प्रयत्न होता. पहिल्या प्रयत्नातून उपशिक्षणाधिकारी पदासाठी निवड झाली आहे. मी संख्याशास्त्र विषयात फर्ग्युसन महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली आहे. – विनायक पाटील, राज्यात पहिला