पिंपरी पालिका आयोजित तीन दिवसीय गणेश महोत्सवाच्या आयोजनावरून सुरू असलेला गोंधळ शेवटपर्यंत सुरूच असल्याचे चित्र मंगळवारी दिसून आले. महोत्सवातील स्थळांमध्ये बदल, ऐन वेळी समाविष्ट झालेले कार्यक्रम, पत्रिकेतील बदल, पत्रकार परिषदेच्या वेळेतील बदल आदींमुळे महोत्सवात समन्वयाचा आणि नियोजनाचा अभाव दिसून आला.
महापौर नितीन काळजे यांनी पत्रकार परिषदेत महोत्सवातील कार्यक्रमांची माहिती दिली. एक ते तीन सप्टेंबर असे तीन दिवस होणाऱ्या या महोत्सवातील कार्यक्रम चिंचवडचे रामकृष्ण मोरे नाटय़गृह, पिंपरीतील आचार्य अत्रे रंगमंदिर तसेच भोसरीतील अंकुशराव लांडगे नाटय़गृहात होणार आहेत. आधी फुले नाटय़गृहात निश्चित करण्यात आलेले कार्यक्रम अत्रे नाटय़गृहात वर्ग करण्यात आले आहेत. ऑटो क्लस्टर येथेही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे उद्घाटक राहतील, असे सांगण्यात येत होते. मात्र, नंतर पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. प्रारंभी दुपारी अडीच वाजता पत्रकार परिषद होणार होती. नंतर, त्याची वेळ सायंकाळी साडेचारनंतर ठेवण्यात आली. सहशहर अभियंता प्रवीण तुपे महोत्सवाचे मुख्य संयोजक आहेत. त्यांनी अभियंता प्रशांत पाटील यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे.
शुक्रवारचे (१ सप्टेंबर) कार्यक्रम चिंचवड नाटय़गृहात होणार आहेत. सायंकाळी सहा वाजता पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, आयुक्त श्रावण हर्डीकर आदी उपस्थित राहणार आहेत. गणेशवंदना, लेझर शो, अशोक हांडे यांचा ‘आवाज की दुनिया’ हा कार्यक्रम होणार आहे. शनिवारचे (२ सप्टेंबर) कार्यक्रम अत्रे रंगमंदिरात होणार आहेत. सायंकाळी फिरोज मुजावर यांची गणेशवंदना, प्रभाकर पवार यांचे काश्मिरी पंडितांच्या ज्वलंत विषयावर आधारित ‘मकबूल’ हे नाटक तसेच महिलांच्या विविध प्रश्नांवर भाष्य करणारे ‘यंदा कदाचित’ हे नाटक होणार आहे. त्यानंतर मराठी व हिंदूी गीतांचा कार्यक्रम होणार आहे. रात्री ‘द कपूर्स डायरी’ हा कपूर घराण्यातील सर्व कलाकारांवर आधारित हा कार्यक्रम आहे. चिंचवडच्या ऑटो क्लस्टर सभागृहात शनिवारी सायंकाळी सातपासून स्थानिक कवींचा सहभाग असलेले कविसंमेलन होणार आहे. रविवारी (३ सप्टेंबर) लांडगे नाटय़गृहात ‘मैफिल ए सदाबहार’ हा जुनी गीते व नृत्यांवर आधारित कार्यक्रम आहे.
केरळ महोत्सव व त्यानंतर समारोपाचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी साडेसहा वाजता भार्गवी चिरमुले, संस्कृती बालगुडे, दीपाली सय्यद, शिवानी भावकार, आशुतोष वाडेकर यांचा सहभाग असणारा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.