‘‘हवामानाच्या अंदाजात वर्तविलेली संभाव्यता महत्त्वाची असते, केवळ आकडेवारी नव्हे. हे अंदाज खूप गुंतागुंतीचे असल्यामुळे ते सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी भारतीय हवामानशास्त्र संस्थेने विशेष प्रयत्न करायला हवेत,’’ अशी अपेक्षा ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मिटिऑरॉलॉजी’चे (आयआयटीएम) संचालक बी. एन. गोस्वामी यांनी व्यक्त केली.
भारतीय हवामानशास्त्र संस्थेतर्फे (आयएमएस) पावसाच्या वार्षिक अंदाजाबाबतच्या दोन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी गोस्वामी बोलत होते. आयआयटीएमचे माजी संचालक डी. आर. सिक्का, आयएमएस (पुणे)चे सचिव सिकंदर जमादार या वेळी उपस्थित होते.
गोस्वामी म्हणाले, ‘‘जागतिक हवामानबदल देशासाठीही चिंतेचे बनले आहेत. या संकटावर हवामानशास्त्राच्या साहाय्याने काही बचावात्मक उपाय योजता येतील. या उपाययोजनांबाबत आयएमएसचा वाटा मोलाचा ठरणार आहे. हवामानाचे अंदाज खूप गुंतागुतीचे असतात. ते समजून घेताना केवळ आकडेवारी नव्हे तर वर्तविलेली संभाव्यता पाहायला हवी. हवामानाचा तालुका पातळीवरील अंदाज वर्तविण्याची आवश्यकता नोंदविली जाते. परंतु वास्तवात असा अंदाज वर्तविणे सध्या शक्य नाही. आयएमएसने या गोष्टी सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे.’’
 

Story img Loader