पुणे : कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात गुरुवारी, तर शुक्रवारी राज्यभरात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तमिळनाडूच्या किनारपट्टीवर वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. तसेच श्रीलंकेपासून बांग्लाच्या खाडीपर्यंत वाऱ्याची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. या दोन्ही वातावरणीय प्रणालींमुळे गुरुवार, २३ नोव्हेंबरपासून बंगालच्या उपसागरावरून आग्नेय दिशेने राज्यात बाष्पयुक्त वारे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुरुवारी, २३ नोव्हेंबर रोजी गोवा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज आहे. शुक्रवारी, २४ नोव्हेंबर रोजी राज्यभरात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
ढगाळ वातावरणाची शक्यता
राज्यात पुढील दोन दिवस, बुधवारपर्यंत कोरडे वातावरण राहण्याची शक्यता असल्यामुळे दोन दिवस किमान तापमानात घट होण्याचा अंदाज आहे. गुरुवारी, २३ नोव्हेंबरनंतर बाष्पयुक्त वारे राज्यात येणार असल्यामुळे पुढील चार-पाच दिवस राज्यभरात ढगाळ वातावरण निर्माण होण्याची आणि किमान तापमानात वाढ होण्याची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
हेही वाचा… Maharashtra News Live : “होय, माझ्या मागे मोठी शक्ती!” राज ठाकरेंच्या दाव्यावर मनोज जरांगेंचं उत्तर
असा आहे अंदाज
२२ नोव्हेंबरपर्यंत – राज्यभरात कोरडे हवामान
२३ नोव्हेंबर – कोकण, मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस
२४ नोव्हेंबर – राज्यभरात तुरळक ठिकाणी हलका पाऊस