पुणे : मोसमी पावसाची अरबी समुद्रातील शाखा सक्रिय असल्यामुळे पुढील चार दिवस कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम घाटाच्या परिसरात जोरदार पावसाचा, तर राज्याच्या उर्वरित भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
दक्षिण गुजरात किनारपट्टीपासून केरळच्या उत्तर किनारपट्टीपर्यंत मागील काही दिवसांपासून हवेच्या कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे वेगाने राज्याच्या किनारपट्टीकडे येत आहेत. त्यामुळे किनारपट्टी आणि पश्चिम घाटाच्या परिसरात पावसाचा जोर आहे. पुढील चार दिवस कोकण आणि घाट परिसरात पावसाचा जोर राहण्याचा अंदाज आहे.
हेही वाचा >>>कर्तव्य चोख बजावल्यावर काही क्षणात पोलिसांवर काळाची झडप, पुणे हिट अँड रन प्रकरणाच्या आधी नेमकं काय घडलं ते वाचा…
मंगळवारसाठी (९ जुलै) सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा आणि पुणे जिल्ह्याला नारंगी इशारा देण्यात आला आहे. राज्याच्या उर्वरित भागात पिवळा इशारा देण्यात आला आहे. मंगळवारी राज्यात सर्वदूर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.
नारंगी इशारा – सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, पुणे
पिवळा इशारा – उर्वरित महाराष्ट्र