पुणे : राज्यात मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी पोषक हवामान असून, पुढील दोन दिवसांत मोसमी पाऊस महाराष्ट्र व्यापणार आहे. त्यामुळे पुढील दोन आठवडे पावसाचा जोर वाढून सर्वदूर पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात मागील आठवडाभर मोसमी पावसाचा जोर कमी झाला होता. आता पुन्हा मोसमी पावसाने जोर धरला आहे. पुढील चार दिवस किनारपट्टी, पश्चिम घाटाचा परिसर आणि विदर्भात मोसमी पावसाचा जोर राहणार आहे. गुरुवारी (२० जून) मोसमी पावसाने नंदुरबार, अमरावती आणि गोंदियापर्यंत आगेकूच केली आहे.

हेही वाचा…राज्यात गुजरातमधून बनावट बियाणांचा पुरवठा, अंबादास दानवे यांचा आरोप

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मोसमी पावसाची अरबी समुद्रावरील शाखा दहा दिवसांच्या खंडानंतर आणि बंगालच्या उपसागरावरील शाखा वीस दिवसांच्या खंडानंतर सक्रिय झाली आहे. अरबी समुद्रातील शाखाने गुरुवारी नंदुरबार, अमरावती आणि गोंदियापर्यंत आगेकूच केली. मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी पोषक हवामान असून, पुढील दोन दिवसांत महाराष्ट्र व्यापून मोसमी पाऊस पुढे वाटचाल करेल.

बंगालच्या उपसागरातील शाखा रेमल चक्रीवादळानंतर कमजोर पडली होती. गुरुवारी ती सक्रिय होऊन तिने पश्चिम बंगाल, बिहारच्या काही भागांत आगेकूच केली आहे. पुढील दोन दिवसांत ओडिसा, बंगाल आणि बिहारमध्ये मोसमी पाऊस वेगाने आगेकूच करण्याचा अंदाज आहे.

हेही वाचा…पुणे: मावळच्या तळेगावात चार ठिकाणी हवेत गोळीबार; अज्ञात दुचाकीवरून फरार

राज्याच्या किनारपट्टीवर मोसमी पावसाचा जोर राहणार आहे. पश्चिम घाटाच्या परिसरात सातारा आणि पुणे जिल्ह्यात चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे. मोसमी पावसाच्या दोन्ही शाखा सक्रिय झाल्यामुळे विदर्भात पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान विभागाने शुक्रवारसाठी किनारपट्टी, पश्चिम घाट परिसराला पिवळा अलर्ट आणि विदर्भातील गडचिरोली, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्याला नारंगी इशारा आणि विदर्भातील अन्य जिल्ह्यांना पिवळा इशारा दिला आहे.

शुक्रवारसाठी इशारा

पिवळा इशारा – सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगरे, ठाणे, पुणे, सातारा, संपूर्ण विदर्भ.

नारंगी इशारा – गडचिरोली, यवतमाळ, अमरावती

हेही वाचा…पिंपरीतील खासगी रुग्णालये, शाळांमधील अग्निप्रतिबंधक उपाययोजनांची तपासणी; महापालिकेकडून रुग्णालये, शाळांना नोटीस

मोसमी पावसाने जोर धरला आहे. सोमवारपर्यंत (२४ जून) पावसाचे प्रमाण हळूहळू वाढत जाईल. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यात पावसाचा जोर राहील. राज्यात सर्वदूर चांगल्या पावसाचा अंदाज आहे. – डॉ. एस. डी. सानप, शास्त्रज्ञ, हवामान विभाग

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Meteorological department predicts heavy monsoon rains to cover maharashtra in next two days pune print news dbj 20 psg
Show comments