पुणे : दक्षिण अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरातील दक्षिण भाग तसेच अंदमान आणि निकोबार बेटांपर्यत पोहोचलेल्या र्नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवास संथावला आहे. हे वारे पुढे सरकण्यास पोषक स्थिती निर्माण झाली नसल्याने दोन दिवस हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र, सोमवारी (५ जून) मोसमी वारे केरळमध्ये, तर १० जूनला महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला.
गेल्या दोन दिवसांत मोसमी वाऱ्यांनी दक्षिण अरबी समुद्राच्या काही भागासह बंगालच्या उपसागरातील दक्षिण भाग तसेच अंदमान निकोबार बेटांचा उर्वरित भाग आणि श्रीलंका, मालदीव, कोमोरीनचा बरासचा भाग व्यापला आहे. मात्र, सध्या ५ जूनला अरबी समुद्राच्या दक्षिणपूर्व भागात चक्रीवादळ तयार होणार आहे. तसेच येत्या ४८ तासांत याच भागात कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे.५ जूनच्या आसपास मोसमी वारे केरळमध्ये, तर १० जूनला महाराष्ट्रात दाखल होण्याची दाट शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला.
राज्यातील काही भागांत दोन दिवस उष्णतेची लाट
राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या बहुतांश भागात उष्णतेच्या तीव्र लाटेबरोबरच अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. ही स्थिती दोन ते तीन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. दिवसभरात वर्धा येथे राज्यात सर्वाधिक ४३.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.