पुणे : स्थानिक वातावरण, कमजोर मोसमी पाऊस, हवामान बदल अशा कारणांमुळे देशभरात ढगफुटीसदृश पावसाच्या घटना वाढल्या आहेत. वेगाने वाढणारे शहरीकरण, उंचच उंच इमारतींमुळे तापमानवाढीचा सामना करीत असलेल्या मोठ्या शहरांमध्ये कमी वेळात जास्त पाऊस पडण्याच्या घटना वाढल्या आहेत, असे मत हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

पुणे येथील हवामान संशोधन आणि सेवा संस्थेच्या प्रमुख डॉ. मेधा खोले म्हणाल्या, ‘राज्यात आणि देशात यापूर्वी पूर्वमोसमी पाऊस पडण्याच्या काळात, मोसमी पाऊस उत्तरेकडे वाटचाल करीत असतानाच्या काळात आणि मोसमी पाऊस देशातून माघारी जात असतानाच्या काळात मुसळधार पाऊस पडतो. हा पाऊस खूप मोठ्या क्षेत्रावर पडत नाही, तर अत्यंत स्थानिक पातळीवर काही किलोमीटर परिघातच हा पाऊस पडतो. सध्या देशभरातच कमी काळात जास्त पाऊस पडण्याच्या घटना वाढल्या आहेत. प्रामुख्याने दाट लोकवस्तीच्या, उंचच उंच इमारती असलेल्या ठिकाणी हे दिसून येते. चिंचवड परिसरात नुकताच झालेला पाऊस हा असाच ढगफुटीचाच प्रकार होता. मोसमी पाऊस कमजोर आहे. पण, हवेत बाष्पाचे प्रमाण जास्त आहे. त्यात स्थानिक तापमानवाढ झाली, की बाष्पाचे ढगांत रूपांतर होते. हे ढग काही भागापुरतेच मर्यादित असतात. ते उंचावर जाऊन अचानक जोरदार पाऊस सुरू होतो. चिंचवडमध्ये याच प्रक्रियेतून पाऊस पडला. मोसमी पावसाची सक्रियता वाढल्यानंतर अशा प्रकारचा पाऊस पडण्याच्या घटना कमी होतील.’

हेही वाचा >>>फर्ग्युसन रस्त्यावरील ‘एल थ्री ’ बारचा परवाना उत्पादन शुल्क विभागाकडून रद्द

हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी म्हणाले, ‘जागतिक हवामान बदल, वृक्षतोड, वाढते शहरीकरण, घनदाट लोकवस्ती, वाढते प्रदूषण आदी घटनांमुळे ढगफुटीसदृश पाऊस पडण्याच्या घटना वाढल्या आहेत. मोसमी पावसाला जोर नसल्यामुळे अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. ढगफुटीसदृश पाऊस फार तर चार ते पाच किलोमीटर परिघात पडतो.’

‘एखादे गाव किंवा शहराच्या विशिष्ट भागात पडणारा पाऊस, हा तेथील स्थानिक वातावरणातील संवहनी क्रियेमुळे पडतो. त्यात स्थानिक पातळीवरील भौगोलिक रचना महत्त्वाची ठरते. सूर्याची उष्णता हाच अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. सूर्याच्या उष्णतेमुळे, ऊर्जेमुळे विशिष्ट भागातील जमिनीचा पृष्ठभाग तापून जमिनीने शोषलेल्या पाण्याचे बाष्पीभवन होऊन या उबदार, दमट पाण्याच्या वाफेचे अवकाशात ऊर्ध्वगमन होते. उंचावरील थंडाव्यातून, पाण्याच्या वाफेचे सांद्रीभवन होऊन फक्त त्या मर्यादित क्षेत्रातच पाऊस पडतो. हाच वातावरणातील संवहनी क्रियेद्वारे पडणारा पाऊस होय. यालाच ढगफुटी किंवा ढगफुटीसदृश पाऊसही म्हणता येईल. अनेकदा समुद्रावरून अति उंचावरून आलेले बाष्प त्यात मिसळले जाऊन त्याचाही स्थानिक बाष्पाशी संयोग होतो. म्हणून तर स्थानिक पातळीवर होणाऱ्या जोरदार पावसाला स्थानिक वातावरणीय ऊर्जेबरोबर समुद्रीय ऊर्जेचा अप्रत्यक्ष संबंध असतो,’ असे हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.

ढगफुटीसदृश पाऊस कधी पडतो?

– साधारण पूर्वमोसमी हंगामातील मार्च ते मे या महिन्यांत.

– मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाल्यानंतर सप्टेंबर, ऑक्टोबर (उत्तरा, हस्त, चित्रा नक्षत्र ) या महिन्यांत.

– मोसमी पावसाचे आगमन व पावसातील खंडानंतरच्या काही दिवसांतील पाऊस हा अशा पद्धतीचा पाऊस असतो.

– एक ते अडीच किलोमीटर निम्न पातळीतील अनेक ढगांपैकी क्युमुलोनिंबस प्रकारच्या ढगातून जर एका तासात १०० मिमी इतका पाऊस झाल्यास त्यास ढगफुटी मानली जाते.

पर्जन्यवृष्टीच्या बदलांचा निष्कर्ष आताच काढता येणार नाही. पर्जन्यवृष्टीच्या पद्धतीत सतत होणारा बदल हे भारतीय उपखंडातील मोसमी पावसाचे वैशिष्ट्य आहे. ३० ते ४० वर्षांच्या सातत्यपूर्ण निरीक्षणानंतरच मोसमी पावसाच्या पर्जन्यवृष्टीच्या पद्धतीत बदल झाल्याचा निष्कर्ष काढता येईल.– डॉ. मेधा खोले, प्रमुख, हवामान संशोधन आणि सेवा विभाग, पुणे</strong>