लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : पाणीपट्टीचे देयक कमी करून देण्यासाठी सोळाशे रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी मीटर निरीक्षकाला महापालिका सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

महापालिकेच्या सांगवी विभागीय कार्यालयात कार्यरत मीटर निरीक्षकाने पाणीपट्टीचे देयक कमी करण्यासाठी सोळाशे रुपयांच्या लाचेची मागणी करून मानधन तत्त्वावरील संगणक महिला ऑपरेटरमार्फत लाच स्वीकारल्याचा आरोप आहे. त्यावरून त्यांच्याविरुद्ध भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. संबंधित निरीक्षक सुटीवर असून, परराज्यात गेल्याने त्यांना अटक झाली नसल्याचे भोसरी पोलिसांनी महापालिका कार्यालयास कळविले.

आणखी वाचा-पिंपरी : बालविवाहाचा प्रकार आळंदीत उघड

पदाचा गैरवापर करून केलेले कृत्य महापालिकेच्या प्रतिमेस अशोभनीय आहे. या कृत्यामुळे महापालिकेची जनमानसातील प्रतिमा मलिन होऊन महाराष्ट्र नागरी सेवा नियमाचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवून मीटर निरीक्षकाला महापालिका सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. त्याची विभागीय चौकशी करण्याचे आदेशही आयुक्त शेखर सिंह यांनी दिले आहेत.

Story img Loader