पुणे मेट्रो प्रकल्पाच्या बाजूची गर्दी वाढवण्यासाठी मेट्रो मार्गाच्या दोन्ही बाजूंना चौपट बांधकाम परवानगी देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असला, तरी मेट्रोसाठी गर्दी वाढवणे हा वाहतूक सुधारणेचा उपायच होऊ शकत नसल्याचे आग्रही प्रतिपादन या क्षेत्रातील तज्ज्ञ करत आहेत. तसेच या प्रस्तावाबात आता मेट्रोसाठी एफएसआय का एफएसआयसाठी मेट्रो असाही प्रश्न विचारला जात आहे.
मेट्रो मार्गाच्या बाजूची सध्याची लोकसंख्या अपुरी असल्यामुळे मेट्रोसाठी गर्दी वाढवावी, अशी सूचना दिल्ली मेट्रोने तयार केलेल्या अहवालात करण्यात आली आहे. त्यानुसार महापालिकेत प्रयत्न सुरू असून ३१.५ किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गालगत दोन्ही बाजूंना पाचशे मीटपर्यंत चार चटई क्षेत्र निर्देशांक (फ्लोअर स्पेस इंडेक्स – एफएसआय) देण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे मेट्रो मार्गाच्या जवळपास चारपट गर्दी होईल, असे गृहीत धरण्यात आले आहे. मुळातच शहरातील अत्यंत गर्दीच्या भागातील गर्दी चार पटींनी वाढवणे हा वाहतूक सुधारणेचा उपाय ठरू शकत नाही, याकडे आता लक्ष वेधण्यात आले आहे. गर्दीच्याच भागात आणखी गर्दी वाढवून प्रश्न कधीच सुटणार नाही, तर तो आणखी बिघडेल. मुळात नागरिकांना त्यांच्या जागी सुविधा उपलब्ध करून देणे हे चांगल्या नियोजनाचे लक्षण आहे, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
नागरिक हरकती नोंदवणार
मेट्रोला चार एफएसआयची तरतूद करण्याच्या प्रस्तावाला पर्यावरणवादी कार्यकर्त्यांकडून तसेच संस्था, संघटनांकडून मोठय़ा प्रमाणावर हरकती-सूचना नोंदवल्या जाव्यात यासाठी सेव्ह पुणे इनिशिएटिव्हतर्फे प्रयत्न सुरू करण्यात आले असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे संस्थेचे दीपक बीडकर यांनी सांगितले.
मेट्रो कंपनी आणि विकसकांचाच फायदा
चार एफएसआयमुळे जागेची किंमत वाढेल अशी आशा जागामालकांना वाटत आहे; पण तसे होणार नाही. कारण जे मालक चार एफएसआय वापरणार नाहीत, त्यांना रेडी रेकनरमधील किमतीच्या दीडपट किमतीवर पाच टक्के इतका अधिभार लावण्याचा अधिकार मेट्रो कंपनीला दिला जाणार आहे. त्यामुळे जागा मोकळी ठेवता येणार नाही. सर्व मालकांवर लवकरात लवकर त्यांच्या जागा विकसकांना विकण्याचे दडपण येणार आहे. सध्याचेच रस्ते, पाणी व अन्य सर्व सोयी-सुविधा आणि गर्दी चौपट असा प्रकार होणार असून एफएसआयचा फायदा मेट्रो कंपनी आणि विकसकांना आणि समस्या नागरिकांच्या वाटय़ाला, असा प्रकार होईल, अशी भीती निनाद माटे यांनी व्यक्त केली आहे. पुणे मेट्रो प्रकल्पाचा अभ्यास केल्यानंतर अनेक त्रुटी लक्षात आल्या. म्हणून त्या पुणेकरांसमोर मांडत असल्याचेही ते म्हणाले. पुण्यात उंचावरून जाणाऱ्या मेट्रोचे नियोजन आहे. मात्र, भुयारी मार्गासाठी प्राथमिक खर्च जास्त असला, तरी फायदे पाहता तोच फायद्याचा ठरतो. मेट्रोच करायची, तर एफएसआय न वाढवता युरोपातील शहरांप्रमाणेच ती भुयारी करावी, अशीही सूचना माटे यांनी केली आहे.
महापालिकेने इमारत उभारून दाखवावी
चार एफएसआयचे गाजर हे नेमके मोठय़ा बिल्डरांचे उखळ पांढरे करण्यासाठी दाखवले जात आहे. त्यामुळे मेट्रोच्या नियमावलीमधील विसंगती दूर करणे अत्यावश्यक आहे. चार एफएसआयच्या वापरासाठी २० हजार चौरस फुटांच्या भूखंडाचे बंधन घालण्यात आले आहे. या भूखंडावर विकास नियंत्रण नियमावलीनुसार ३० टक्के जागेवर छोटी घरे बांधून द्यायची, का नाही द्यायची याचा खुलासा झालेला नाही. महापालिकेनेच सर्व नियमांनुसार २० हजार चौरस फुटांच्या भूखंडावर चार एफएसआय कसा वापरायचा याचे मॉडेल तयार करून दाखवावे.
सुधीर काका कुलकर्णी, अध्यक्ष, नागरी हक्क संस्था
… का चार एफएसआयसाठी मेट्रो ?
तसेच या प्रस्तावाबात आता मेट्रोसाठी एफएसआय का एफएसआयसाठी मेट्रो असाही प्रश्न विचारला जात आहे.
First published on: 06-08-2014 at 03:30 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Metro fsi pmc objection