पुणे मेट्रो प्रकल्पाला हरकती-सूचना दाखल करण्याची मुदत गुरुवारी (१४ ऑगस्ट) संपत असून हरकती नोंदवण्यासाठी एक महिन्यांची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आली आहे. रिपब्लिकन पक्ष तसेच पुणे बचाव समितीनेही हरकती-सूचना नोंदवण्यासाठी मुदतवाढीची मागणी केली आहे.
पुणे मेट्रो प्रकल्पाच्या निधी उभारणीसाठी तसेच मेट्रो मार्गाच्या बाजूने लोकसंख्येची घनता वाढवण्यासाठी मेट्रो मार्गाच्या दोन्ही बाजूंना पाचशे मीटपर्यंत चार चटई क्षेत्र निर्देशांक (फ्लोअर स्पेस इंडेक्स- एफएसआय) देण्याचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावाला सर्व स्तरातून विरोध होत असून हा फक्त बांधकाम व्यावसायिकांच्या हिताचा प्रस्ताव असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. मेट्रोसाठी चार एफएसआय देऊ नये, अशी मागणी अनेक स्वयंसेवी संस्थांनीही केली आहे.
मेट्रो प्रकल्पाला हरकती देण्याची मुदत गुरुवार (१४ ऑगस्ट) पर्यंत आहे. या मुदतीत एक महिन्यांची वाढ करावी, अशा मागणीचे पत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महापालिकेतील गटनेता वसंत मोरे आणि नगरसेविका आरती बाबर, अर्चना कांबळे, रूपाली पाटील यांनी बुधवारी दिले. अशाच मागणीचे पत्र आरपीआयचे गटनेता डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनीही दिले असून एक महिना मुदतवाढीची मागणी करण्यात आली आहे. चार एफएसआय देण्यासंबंधीच्या प्रस्तावाचे नकाशे उपलब्ध नाहीत. तसेच जे नकाशे उपलब्ध आहेत, त्यांच्यावर आयुक्तांची स्वाक्षरी नाही. हे नकाशे मुख्य सभेतही सादर करण्यात आलेले नाहीत. ना विकास विभागाबाबतही नागरिकांना माहिती नाही. हरकती-सूचना नोंदवण्यापूर्वी या प्रस्तावाची योग्य माहिती होणे आवश्यक आहे. त्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी पुणे बचाव समितीचे उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी, नगरसेवक प्रशांत बधे यांनी केली आहे.

Story img Loader