पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अखेर पुणेकरांसाठी मेट्रो सेवा सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मेट्रो रेल्वेचा लोकार्पण सोहळा पार पडला आहे. उद्घाटनांतर पुणेकरांना मेट्रोने प्रवास करता येणार आहे. सहा मार्चला दुपारी तीन ते रात्री नऊ या वेळेत पुणे आणि पिंपरीतील दोन्ही मार्गिकांवर मेट्रोची सेवा नागरिकांसाठी खुली करण्यात येणार आहे. तसेच सोमवारपासून पुणेकरांना दररोज सकाळी आठ ते रात्री नऊदरम्यान मेट्रोतून प्रवास करता येणार आहे.
मात्र पुण्यासोबत पिंपरी-चिंचवडच्या मेट्रोचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन झालं. पण, पिंपरी ते फुगेवाडी येथील मेट्रोच्या दोन कोचच्या काचांना तडे गेल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता मेट्रो सुरू करण्यास घाई करण्यात आली का असा प्रश्न उपस्थित होत आहे. ही बाब मेट्रोच्या अधिकाऱ्यांच्या लक्ष्यात आल्यानंतर सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. हा देखभालाची भाग असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
उद्घाटनाच्या दिवशीच मेट्रोच्या डब्याच्या काचांना तडे गेल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. मात्र आज रात्री ते बदलले जातील अशी कबुली मेट्रो अधिकाऱ्यांनी दिली आहे. “आमच्या देखभालीच्या पायाभूत सुविधा सर्व तयार आहेत. मेट्रोचे दररोज देखभाल होणार आहे. काचांना तडे गेल्या तपासून पाहण्यात येईल. आज रात्री पुन्हा याची तपासणी करण्यात येणार आहे,” असे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
तर प्रवाशांच्या सुरक्षिततेची संपूर्णपणे खातरजमा करण्यात आलेली आहे. मेट्रोच्या काच बदलण्याचे काम त्वरित करण्यात येईल, असे स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, पुणे मेट्रोला हिरवा कंदील दाखवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची एमआयटी कॉलेजच्या मैदानावर आयोजित कार्यक्रमात भाषण केले. “आज पुण्याच्या विकासाशी जोडलेल्या इतर प्रकल्पांचंही उद्घाटन झालं आहे. पुणे मेट्रोच्या शिलान्याससाठी तुम्ही मला बोलावलं होतं आणि आता लोकार्पणाची संधी देखील तुम्ही मला दिली हे माझं भाग्य आहे. आधी शिलान्यास व्हायचे, पण माहितीच नसायचं की उद्घाटन कधी होईल. मित्रांनो, ही घटना यासाठी महत्त्वाची आहे, की वेळेवर योजना पूर्ण होऊ शकतात हा संदेश यामध्ये आहे,” असे पंतप्रधान मोदींनी म्हटले.
“पुणे नेहमीच आपली सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि राष्ट्रभक्तीच्या प्रेरणेसाठी प्रसिद्ध राहिलं आहे. तसेच, आयटी क्षेत्रातही पुण्यानं आपली ओळख तयार केली आहे. त्यामुळे आधुनिक सुविधा पुण्याच्या लोकांची गरज आहे. पुणेकरांच्या याच गरजा लक्षात घेता आमचं सरकार अनेक बाबतीत काम करत आहे. मी आत्ताच पुणे मेट्रोमध्ये प्रवास केला. मेट्रोमुळे पुण्यात दळण-वळण सोपं होईल, प्रदूषण आणि ट्रॅफिकपासून काहीशी सुटका होईल,” असे मोदी म्हणाले.
पुणेकरांच्या सहनशीलतेला खऱ्या अर्थानं दाद दिली पाहिजे – अजित पवार</strong>
पुणेकरांच्या सहनशीलतेला खऱ्या अर्थानं दाद दिली पाहिजे. १० जूनला पुणे महानगर पालिकेनं ठराव पास केला होता की आपल्याला मेट्रो हवी. त्यानंतर १२ वर्ष सुरू करायला लागली. मधल्या काळात काही लोकप्रतिनिधींच्या हट्टासाठी ती जमिनीवर करायची की अंडरग्राऊंड यामध्येच बराच वेळ गेला. पण नंतर गडकरींनी कठोर भूमिका स्वीकारली आणि मेट्रोच्या कामाला सुरुवात झाली. पुणेकर आणि पिंपरी-चिंचवडकरांना मेट्रोच्या कामामुळे खूप त्रास सहन करावा लागला. अजून काही काळ तो त्रास सहन करावा लागणार आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.