कोणत्याही शहरात मेट्रो प्रकल्पाची सुरुवात ही लहान मार्गिकेने झाल्याचे आणि त्याचा विस्तार होत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात होत असलेल्या मेट्रो प्रकल्पाचा विस्तार भविष्यात नक्की होईल. केवळ दोन मार्गापुरताच मेट्रो प्रकल्प मर्यादित न राहता निगडी, मोशी, चाकणपर्यंत मेट्रो नेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, अशी माहिती महामेट्रोचे सल्लागार शशिकांत लिमये यांनी येथे दिली.

महामेट्रो आणि पिंपरी-चिंचवड सिटिझन्स फोर (पीसीसीएफ) यांच्या वतीने सायन्स पार्क येथे आयोजित मेट्रो संवाद कार्यक्रमात शशिकांत लिमये बोलत होते. मेट्रो प्रकल्पाचे अधिकारी संतोष पाटील, पीसीसीएफचे मुख्य समन्वय वैभव घुगे, समन्वयक तुषार शिंदे, आनंद पानसे, बिल्वा देव, सूर्यकांत मुथीयान, रोहन निघोजकर, अमोल देशपांडे या वेळी उपस्थित होते.

पुणे मेट्रो प्रकल्प निगडी आणि पुढे कात्रजपर्यंत न्यावा अशी मागणी सातत्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील नागरिकांकडून होत आहे. या पाश्र्वभूमीवर बोलताना शशिकांत लिमये म्हणाले, की मेट्रो प्रकल्प हा सन २०१३ मध्ये मान्य झाला आहे. या प्रकल्पाचे काम आत्ता सुरू झाले आहे. मात्र असे असले तरी केवळ दोन मार्गावर संकुचित न राहता आम्ही पुढे निगडी, मोशी, चाकण येथेही मेट्रो प्रकल्प नेण्यासाठी प्रयत्नशील आहोत. कोणत्याही शहरात मेट्रो प्रकल्पाची सुरुवात ही लहान मार्गिकेने झाली असून नंतर त्यांचा विस्तार झाला आहे. बंगळूर, चेन्नई, दिल्ली मेट्रोची उदाहरणे त्यासाठी देता येतील. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात होत असलेल्या मेट्रो प्रकल्पाचाही भविष्यात नक्की विस्तार होईल.

Story img Loader