पुणे शहरासाठी दुसऱ्या टप्प्यातील स्वारगेट ते चिंचवड या मेट्रोऐवजी कात्रज ते निगडी या मेट्रोमार्ग झाला पाहिजे, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. या प्रकल्पाला कॅबिनेटच्या बैठकीमध्ये मान्यता दिली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही मेट्रोविषयी भाष्य केले. पुणेकरांचे जीवन सुसह्य़ करण्यासाठी मेट्रोची पुढील प्रक्रिया लवकरच सुरू होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
महापालिकेच्या वतीने औंध येथे उभारण्यात आलेले भारतरत्न भीमसेन जोशी कलामंदिर व महाराजा सयाजीराव गायकवाड उद्योग भवनाचे उद्घाटन रविवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. महापौर वैशाली बनकर, खासदार सुरेश कलमाडी, वंदना चव्हाण, आमदार शरद रणपिसे, गिरीश बापट, मोहन जोशी, रमेश बागवे, विनायक निम्हण, माजी आमदार चंद्रकांत छाजेड, नगरसेवक सनी निम्हण, संगीता गायकवाड, पालिका आयुक्त महेश पाठक, पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ आदी या वेळी उपस्थित होते. या वेळी पालिकेच्या वतीने दुष्काळनिधीसाठी एक कोटी ३५ लाख रुपयांचा निधी देण्यात आला.
पवार म्हणाले, वारजे ते रामवाडी या मेट्रोच्या पहिल्या टप्प्याला मंजुरी देण्यात आली आहे. दुसरा टप्पा स्वारगेट ते चिंचवड असा आहे. मात्र, हा टप्पा कात्रज ते निगडी असा व्हावा. त्याला मंत्रिमंडळात मान्यता द्यावी लागेल. त्या दृष्टीने सकारात्मक विचार केला जाईल. दुसरा मार्ग जात असलेल्या महापालिकांनी प्रत्येकी दहा टक्के निधी द्यावा.
मुख्यमंत्री म्हणाले, दुष्काळी परिस्थितीमध्ये राज्यभरात लोकसहभागातून मोठी कामे झाली. अशाच प्रकारे लोकसहभागातून कामे केली, तर पुण्यातील अनेक प्रश्न सुटू शकतील. त्यातून शहराचा विकास होऊ शकतो. सर्वानी एकत्रितपणे मनात आणले, तर लोकसहभागातून शासनाच्या प्रयत्नांनाही मोठी मदत मिळेल. भारतरत्न भीमसेन जोशी कलामंदिरामुळे पुण्याच्या वैभवात भर पडली आहे, असेही ते म्हणाले.
अजितदादांचे आता जरा सांभाळूनच!
आमदार विनायक निम्हण यांनी भाषणामध्ये मुख्यमंत्र्यांची स्तुती केल्याच्या धागा पकडून अजित पवार यांनी ‘‘मंत्रिमंडळाचा विस्तार आहे की काय,’’ हे एकच वाक्य उच्चारले. त्याला उपस्थितांना दाद दिली. महापालिकेने दुष्काळासाठी दिलेला दिलेला निधी थोडा आधी दिला असता, तर आणखी उपयोग झाला असता, अशा आशयाचा चिमटाही त्यांनी काढला. ‘‘थोडं बोलल्याशिवाय मला तरी कुठं करमतंय,’’ असे सांगताना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींकडे पाहून ते म्हणाले, ‘‘यांचे माझ्यावर खूप प्रेम आहे,’’ काही दिवसांपूर्वी दुष्काळाबाबत एका कार्यक्रमात वापरलेल्या अपशब्दामुळे अजित पवार यांच्यावर जोरदार टीका झाली होती. त्या पाश्र्वभूमीवर केलेल्या या वक्तव्याने उपस्थितांमध्ये चांगलीच कुजबूज झाली. ‘‘यापुढे पुणेकर व जिल्ह्य़ाचा नावलौकिक कमी होईल असे काही माझ्याकडून होणार नाही,’’ अशी ग्वाहीही त्यांनी शेवटी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा