कोथरूडच्या कचरा डेपोच्या जागी मेट्रोचे स्टेशन होण्याबाबत काही लोकांकडून खो घातला जात असून, त्या ठिकाणी शिवसृष्टी व्हावी, असे बोलले जाते. भावनिक प्रश्न निर्माण करून शहरातील वाहतुकीचा प्रश्न सुटणार नाही. शिवसृष्टी कुठेही करता येईल, मात्र मेट्रोचे स्टेशन इतरत्र होऊ शकणार नाही, असे सांगत उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी या जागेवर मेट्रोचे स्टेशनच होणार असल्याचे स्पष्ट केले.
पुणे पालिकेच्या वतीने बांधण्यात येणाऱ्या कर्वेनगर-वारजे उड्डाणपुलाच्या कामाचे भूमिपूजन पवार यांच्या हस्ते रविवारी झाले. त्या वेळी ते बोलत होते. महापौर वैशाली बनकर, खासदार वंदना चव्हाण, आमदार चंद्रकांत मोकाटे, बापू पठारे, नगरसेवक दिलीप बराटे, लक्ष्मी दुधाने आदी त्या वेळी उपस्थित होते.
पवार म्हणाले, आपण राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करू. पण, निवडणुका संपल्या की कोणत्याही पक्षाने राजकारण करू नये. मेट्रोच्या स्टेशनच्या जागेबाबत वाद निर्माण केला जातो. शिवाजी राजे हे सर्वाचे दैवत आहेत. पण, मेट्रोचा मार्ग लक्षात घेतला, तर स्टेशनसाठी मोकळी जागा कचरा डेपोचीच आहे. त्यामुळे हा प्रश्न भावनिक करून चालणार नाही.
विकास आराखडय़ाबाबत ते म्हणाले, बांधकाम व्यावसायिकांना धार्जिण्या उपसूचना विकास आराखडय़ाबाबत काहींनी दिल्याचे वर्तमानपत्रात वाचनात आले. अशा काही गडबडी झाल्या असतील, तर त्या रद्द करण्याचा अधिकार आम्हाला आहे. सार्वजनिक हिताचे कोणतेही आरक्षण रद्द केले जाणार नाही.
‘बहुमत नसल्याने अडचणी’
एका विचाराचे शहरात बहुमत असल्यास काय होऊ शकते ते िपपरी-चिंचवडमध्ये जाऊन पाहावे, असे सांगून पवार म्हणाले की, शहराचा सर्वागीण विकास झाला पाहिजे. पुणे सध्या वाढते आहे. त्यात नव्याने गावे घेऊ नका, अशी मागणी केली जाते. मात्र, त्यात राजकारण आणले जाऊ नये. शहराला दुसरी पालिका करण्याबाबतही मागणी आहे. त्याबाबतही आपण विचार करतो आहोत. मात्र, आता शहर चोहोबाजूने वाढत असताना त्यादृष्टीने नियोजनाचा विचार झाला पाहिजे. शिवणे ते चंदननगर-खराडीपर्यंत वाहतुकीत सुलभता व्हावी, यासाठी रस्ता बांधण्यात येणार आहे. पुण्यात कुणाला बहुमत मिळत नाही. त्यामुळे निर्णय घेण्यात अडचणी येतात. िपपरी-चिंचवडमध्ये आम्हाला झटपट निर्णय घेता येतात तसे पुण्यात करता येत नाही.
सीसीटीव्हीची योजना लवकरच
पुणे शहराची वाहतुकीची समस्या गंभीर झाली असल्याचे सांगून अजित पवार म्हणाले, अनेकजण वाहतुकीची शिस्त पाळत नाहीत. वाहतुकीबाबत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. सिग्नल तोडणाऱ्यांना पकडण्यासाठी चौकांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची योजना लवकरच प्रत्यक्षात येणार आहे. सिग्नल तोडला की त्याच्या फोटोच्या पुराव्यासह दंड वसुलीसाठी घरपोच पत्र येईल. तीनदा तसाच प्रकार घडल्यास वाहन चालविण्याचा परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल.
मेट्रोचे स्टेशन कोथरूडच्या कचरा डेपोच्या जागीच होणार
भावनिक प्रश्न निर्माण करून शहरातील वाहतुकीचा प्रश्न सुटणार नाही. शिवसृष्टी कुठेही करता येईल, मात्र मेट्रोचे स्टेशन इतरत्र होऊ शकणार नाही, असे सांगत उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी या जागेवर मेट्रोचे स्टेशनच होणार असल्याचे स्पष्ट केले.
आणखी वाचा
First published on: 12-02-2013 at 05:24 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Metro station will be developed at kothrud garbage depo