शहरातील वर्तुळाकार मार्गावरील ४४ किलोमीटर अंतराच्या परिसरात मेट्रो धावणार आहे. प्रामुख्याने शहराच्या उपनगरांना मेट्रो मार्गाच्या माध्यमातून जोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याबाबतचा पूर्व व्यवहार्यता अभ्यास अहवाल (प्री फिजिबिलिटी रिपोर्ट) महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला असून सध्याच्या दोन्ही मेट्रो मार्गिका या वर्तुळाकार मार्गाशी निगडित असणार आहेत.

मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत माíगका क्रमांक एक स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड आणि वनाज ते रामवाडी या मार्गिका क्रमांक दोनचे काम महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (महामेट्रो) वतीने सुरू आहे. सध्या हे काम वेगात सुरू असून दोन्ही मार्गिकांवर स्टेशन उभारणीच्या कामाला लवकरच प्रारंभ होणार आहे. महापालिकेच्या आगामी वर्षांच्या अंदाजपत्रकातही (सन २०१८-१९) मेट्रो प्रकल्पासाठी महापालिकेच्या हिश्श्यापोटीची बारा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या पाश्र्वभूमीवर मेट्रो प्रकल्पाबाबतची माहिती महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सोमवारी पत्रकारांना दिली.

स्वारगेट-पिंपरी-चिंचवड मार्गिकेचे काम सुरू असतानाच स्वारगेट ते कात्रज हा नवा मार्गही महापालिका प्रशासनाकडून करण्याचे नियोजन झाले आहे. महामेट्रोने त्यासाठीचा सविस्तर प्रकल्प आराखडा (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट- डीपीआर) करण्यासाठी महामेट्रोच्या अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला आहे. या डीपीआरसाठी साठ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पुढील टप्प्यात शहरातील वर्तुळाकर मार्गावर मेट्रो प्रकल्प राबविण्याच्या हालचाली महापालिका प्रशासनाकडून सुरु झाल्या आहेत.

‘शहरातील उपनगरांना जोडणारा ४४ किलोमीटर मार्ग मेट्रो मार्गिकेने वर्तुळाकार पद्धतीने जोडण्यात येणार आहे.

त्याचा पूर्व व्यवहार्यता अभ्यास अहवाल तयार झाला आहे. तो अंतिम झाल्यानंतर महामेट्रोला त्याचा आराखडा करण्यास सांगण्यात येईल. वनाज ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या दोन्ही मार्गिकांशी नवा मार्ग संलग्न असेल,’ असे आयुक्त कुणाल कुमार यांनी सांगितले.

Story img Loader