पुणे – शहरातील गणेशोत्सव पाहण्यासाठी शहरासह विविध भागांतून नागरिक शहरात येतात. त्या दरम्यान नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून गणेशोत्सव काळातील शेवटचे पाच दिवस मेट्रो रात्री १२ पर्यंत सुरू ठेवण्यात यावी, अशा सूचना संबधित अधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गणेशोत्सव २०२३ नियोजनाबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार माधुरी मिसाळ, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्यासह शहरातील गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा – दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल राज्य मंडळाकडून जाहीर
अजित पवार म्हणाले की, शहरातील गणेश मंडळांच्या अनेक सूचना आल्या आहेत. त्यावर प्रशासन निश्चित काम करेल आणि गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना कोणताही त्रास होणार नाही याची विशेष काळजी घेतली जाणार आहे. तसेच दरवर्षी विसर्जन मिरवणूक खूप तास चालते, त्यामुळे प्रशासनावर ताण येतो. हे लक्षात घेऊन श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाने दुपारी चार वाजता विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या निर्णयाचे आम्ही विशेष स्वागत करतो. त्याचबरोबर आपण यंदाचा गणेशोत्सव चांगल्या प्रकारे साजरा करूया, असा संकल्प केल्याचे त्यांनी सांगितले.