पिंपरी : पिंपरी ते निगडीतील भक्ती-शक्ती चौकापर्यंत मेट्रो धावण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. निगडीपर्यंतच्या प्रस्तावाला केंद्रीय गृहनिर्माण व नागरी कामकाज मंत्रालयाने सोमवारी २३ ऑक्टोबर मान्यता दिली. त्यामुळे शहरवासीयांचे निगडीपर्यंत मेट्रोचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पहिल्या टप्प्यात पिंपरी ते दापोडी हा ७.९ किलोमीटरचा मार्ग १ ऑगस्ट २०२३ पासून सुरू झाला होता. तर, पिंपरी ते फुगेवाडी हा मार्ग ६ मार्च २०२२ पासून सुरू झाला आहे. या मार्गाच्या कामासोबत पिंपरी ते निगडी या ४.१३ किलोमीटर अंतराच्या मार्गाचे काम सुरू करावे, अशी नागरिकांची आग्रही मागणी होती. त्यासाठी सातत्याने आंदोलने झाली. त्यानंतर राज्य सरकारने निगडीपर्यंतच्या मेट्रो मार्गाला मान्यता दिली. केंद्र सरकारकडे दोन वर्षांपासून प्रस्ताव रखडला होता. अखेर केंद्रीय गृहनिर्माण व नागरी कामकाज मंत्रालयाचे उपसचिव सुनील कुमार यांनी निगडीपर्यंत मेट्रोला मान्यता दिल्याचे पत्र राज्य सरकारला पाठविले आहे. त्यामुळे निगडीपर्यंत मेट्रो धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

हेही वाचा – अपघाती मृत्यूबाबतची कागदपत्रे देण्यासाठी मागितली लाच; पोलीस उपनिरीक्षकासह वकील गजाआड

या विस्तारित मार्गावर चिंचवड स्टेशन येथील पिंपरी पोलीस ठाणे, आकुर्डीतील खंडोबा माळ चौक आणि निगडीतील भक्ती-शक्ती समूह शिल्प चौक असे तीन स्टेशन आहेत. हा मार्ग ४.१३ किलोमीटर लांबीचा असून तो उन्नत (एलिव्हेटेड कॉरिडॉर) मार्ग असणार आहे. खर्चात केंद्र सरकार आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचा समप्रमाणात वाटा असेल. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अंदाजे खर्च ९१०.१८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या मार्गामुळे निगडी ते दापोडी या मुख्य मार्गावर १२.५० किलोमीटर अंतराची मेट्रो प्रवासी सेवा उपलब्ध होईल.

हेही वाचा – ‘राज्यकर्ता असूनही सांगतो, काही गोष्टींसाठी मोर्चे काढा…’ चंद्रकांत पाटील यांचे विधान; दोनवेळा शाई फेकल्यावर तीन मिनिटांत शर्ट बदलून बाहेर पडलो

शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. निगडीपर्यंत मेट्रो धावण्याचे शहरवासीयांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि पिंपरी-चिंचवडमधील रहिवाशांना चांगली ‘कनेक्टिव्हिटी’ देण्यासाठी हा मेट्रो प्रकल्प फायदेशीर ठरणार आहे. लवकरच प्रकल्पाचे काम सुरू होईल. – श्रीरंग बारणे, खासदार

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Metro will run till nigdi the dream of city people will be fulfilled pune print news ggy 03 ssb