पुणे: पुणे मेट्रोची रुबी हॉल ते रामवाडी या मार्गावरील सेवा मागील वर्षाच्या अखेरीस सुरू होणे अपेक्षित होते. परंतु, त्यासाठी आता नवीन वर्ष उजाडले आहे. या मार्गाचे काम पूर्ण होत आले असून, मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांचे पथक या आठवड्यात तपासणीसाठी येत आहे. या पथकाकडून आठवडाभर या मार्गाची तपासणी होणार आहे. त्यानंतर खुद्द आयुक्त येऊन पाहणी करणार आहेत.
मागील वर्षाच्या अखेरीस रुबी हॉल ते रामवाडी या विस्तारित मार्गाची मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून तपासणी आणि त्यांची मंजुरी घेण्याचा महामेट्रोचा प्रयत्न होता. या गोष्टी मागील वर्षात पूर्ण करून नवीन वर्षाच्या सुरुवातीला विस्तारित मार्ग सुरू करण्याचे महामेट्रोचे नियोजन होते. मात्र, या मार्गावरील येरवडा स्थानकाचे जिने नगर रस्त्यावर येत होते. महामेट्रोकडून या जिन्यांसाठी खांब उभारणीचे काम सुरू करण्यात आले होते. परंतु, स्थानिक नागरिकांनी वाहतूककोंडी होत असल्याने या कामाला विरोध केला. अखेर महापालिकेने हे जिने दुसरीकडे हलविण्यास महामेट्रोला सांगितले.
हेही वाचा… संजय राऊतांच्या आरोपानंतर सरकार जागे! आरोग्य सहसंचालकांची उचलबांगडी
महापालिकेने सांगितल्यानुसार महामेट्रोने येरवडा स्थानकाच्या प्रवेशद्वाराच्या रचनेत काही बदल केले. या बदलामुळे येरवडा स्थानकाच्या जिन्याचे काही खांब पाडण्याची वेळ महामेट्रोवर आली. आता ते नव्याने उभारण्यात येत आहेत. यामुळे मेट्रोकडून काम पूर्ण होण्यास विलंब झाला. आता काम पूर्ण होत आले असून, मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांचे पथक या आठवड्यात पुण्यात दाखल होत आहे. पथक विस्तारित मार्गाची आठवडाभर तपासणी करणार आहे. या पथकाकडून आयुक्तांकडे अहवाल सादर केला जाईल. त्यानंतर आयुक्त प्रत्यक्ष येऊन या मार्गाची तपासणी करतील. आयुक्तांनी या मार्गाला हिरवा कंदील दिल्यानंतर महामेट्रोकडून मार्ग सुरू करण्याबाबत राज्य सरकारला पत्रव्यवहार केला जाईल. त्यानंतर राज्य सरकार मार्ग सुरू करण्याचा अंतिम निर्णय घेईल, अशी माहिती महामेट्रोतील सूत्रांनी दिली.
स्वारगेटपर्यंतच्या टप्प्याला विलंब
जिल्हा न्यायालय ते स्वारगेट हा भुयारी मार्ग आहे. या मार्गावर बुधवार पेठ, मंडई आणि स्वारगेट ही तीन स्थानके आहे. या मार्गाचे काम पूर्ण झाले असले तरी तिन्ही स्थानकांचे काम सध्या सुरू आहे. ही स्थानके भुयारी असल्याने त्यांच्या कामाला विलंब लागत आहे. हे काम मार्चअखेरपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
रुबी हॉल ते रामवाडी मार्ग
स्थानके – बंडगार्डन, येरवडा, कल्याणीनगर, रामवाडी
सुरू कधी – फेब्रुवारीच्या सुरुवातीला शक्य
जिल्हा न्यायालय ते स्वारगेट
स्थानके – बुधवार पेठ, मंडई, स्वारगेट
सुरू कधी – मार्चपर्यंत काम पूर्ण होऊन एप्रिल उजाडणार
रुबी हॉल ते रामवाडी या विस्तारित मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून या मार्गाची तपासणी होणार आहे. त्यांनी मंजुरी दिल्यानंतर राज्य सरकार या मार्गावर मेट्रो सेवा सुरू करण्याचा निर्णय घेईल. – हेमंत सोनावणे, कार्यकारी संचालक, महामेट्रो