संजय जाधव

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : मेट्रो स्थानकांच्या संरचनात्मक लेखापरीक्षणावर (स्ट्रक्चरल ऑडिट) पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाने मेट्रो स्थानकांच्या केवळ वरील भागाचे स्ट्रक्चरल ऑडिट केल्याचे आता समोर आले आहे. त्यात स्थानकांच्या पायाच्या भागाच्या तपासणीचा समावेश नाही. दरम्यान, स्थानकांच्या केवळ वरील भागाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आल्याने तेवढेच स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आल्याची भूमिका महामेट्रोने घेतली आहे.

मेट्रो स्थानकांच्या उभारणीत आढळलेल्या त्रुटी पुण्यातील काही ज्येष्ठ अभियंत्यांनी समोर आणल्या होत्या. त्यांनी याप्रकरणी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्या वेळी सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाने पुन्हा स्ट्रक्चरल ऑडिट करून सात दिवसांत अहवाल सादर करण्यात येईल, असे न्यायालयाला सांगितले होते. याचबरोबर विद्यापीठातील बडतर्फ सहयोगी प्राध्यापक ईश्वर सोनार यांचा स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल प्राथमिक असल्याचे म्हटले होते. यानुसार वनाज ते गरवारे या दरम्यानच्या पाच स्थानकांचे अंतिम स्ट्रक्चरल ऑडिट विद्यापीठाने पुन्हा करून तो अहवाल सादर केला.

आणखी वाचा-अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलकडून पाच किलो सोने जप्त

आता या नव्याने केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. ज्येष्ठ अभियंते नारायण कोचक यांनी याप्रकरणी २७ सप्टेंबरला विद्यापीठाला पत्र लिहिले. त्यात त्यांनी या स्ट्रक्चरल ऑडिटबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यात त्यांनी मेट्रो स्थानकांच्या केवळ वरील भागाचे स्ट्रक्चरल ऑडिट केल्याचा मुद्दा मांडला आहे. याचबरोबर महामेट्रोने दिलेल्या अहवालांच्या आधारे विद्यापीठाने निष्कर्ष काढले असून, स्वतंत्रपणे तपासणी केली नाही, असा आक्षेपही नोंदवला आहे. या पत्राला विद्यापीठाने ३१ ऑक्टोबरला उत्तर पाठविले आहे. हे पत्र अद्याप कोचक यांच्यापर्यंत पोहोचलेले नाही.

स्ट्रक्चरल ऑडिटवर उपस्थित केलेले प्रश्न

  • स्ट्रक्चरल ऑडिट नसून केवळ तपासणी अहवाल
  • स्थानकांच्या संरचनेच्या महत्त्च्या पैलूंकडे दुर्लक्ष
  • स्थानकांच्या केवळ स्टीलच्या रचनेची तपासणी
  • स्थानकांच्या आरसीसी बांधकामाची तपासणी नाही
  • मेट्रो स्थानकांच्या सुरक्षिततेबाबत ठोस निष्कर्ष नाही

मेट्रोची सेवा वनाज ते गरवारे या मार्गावर दीड वर्षाहून अधिक काळ सुरू आहे. आतापर्यंत कोणतीही समस्या त्यात निर्माण झालेली नाही. मेट्रो स्थानकांच्या वरील भागाच्या रचनेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यामुळे सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाकडून स्थानकांच्या केवळ वरील भागाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. -अतुल गाडगीळ, संचालक, महामेट्रो

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Metros structural audit mess inspection by coep of stations only pune print news stj 05 mrj