पाच जानेवारीपर्यंत कागदपत्रे आणि दहा टक्के रक्कम ऑनलाइन भरण्याची सूचना

पुणे : पुणे महानगर व क्षेत्र विकास मंडळाकडून (म्हाडा) ८१२ घरांसाठी बुधवारी ऑनलाइन सोडत काढण्यात आली. या सोडतीमध्ये नावे आलेल्यांना पाच जानेवारीपर्यंत कागदपत्रे आणि दहा टक्के रक्कम ऑनलाइन भरावी लागणार आहे. या मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्यांची घरे रद्द केली जाणार आहेत. यापुढील लॉटरी जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात तीन हजार सातशे घरांसाठी काढण्यात येणार आहे.

अल्पबचत भवन येथे सकाळी अकरा वाजता सोडत जाहीर करण्यास सुरुवात करण्यात आली. सोडतीमध्ये घरे मिळालेल्या नागरिकांना पाच जानेवारीपर्यंत संबंधित कागदपत्रे ‘लॉटरी डॉट म्हाडा डॉट जीओव्ही डॉट इन’ या संकेतस्थळावर सादर करावी लागणार आहेत. तसेच घराच्या किमतीच्या दहा टक्के रक्कम ऑनलाइन भरावी लागणार आहे. या मुदतीत कागदपत्रे आणि दहा टक्के रक्कम न भरणाऱ्यांची सोडतीत मिळालेली घरे रद्द केली जाणार आहेत.

या सोडतीनंतर जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात तीन हजार सातशे घरांसाठी सोडत काढण्यात येणार आहे. ही घरे पिंपरी-चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली येथील आहेत. वन अ‍ॅण्ड टू बीएचके आणि रो हाऊ स या स्वरुपाची ही घरे आहेत, अशी माहिती म्हाडा पुणे विभागाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील यांनी दिली. म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत, पुणे विभागाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे या वेळी उपस्थित होते.

दरम्यान, बुधवारी झालेल्या सोडतीमध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील अनुक्रमे २४२ आणि ५७० अशा ८१२ घरांचा समावेश होता. त्यासाठी ३६ हजार ५६५ जणांनी अर्ज भरले होते. पुण्यात महंमदवाडी, धानोरी, पाषाण, बावधन, येवलेवाडी आणि आंबेगाव बुद्रुक, तर पिंपरी-चिंचवडमधील वाकड, पुनावळे, पिंपळे सौदागर, ताथवडे, किवळे, रहाटणी, पिंपळे निलख, बोऱ्हाडेवाडी, मोशी, चिखली आणि चोवीसवाडी येथील प्रकल्पांमधील ही घरे आहेत.

Story img Loader