पुणे : पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) पुणे, पिंपरी-चिंचवड, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासह सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील ३ हजार ३६२ सदनिकांसाठी बुधवारी (२९ जानेवारी) सोडत काढली जाणार आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहनिर्माण राज्यमंत्री डाॅ. पंकज भोयर यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने सोडत काढली जाणार आहे. यावेळी म्हाडाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील, गृहनिर्माण विभागाचे अप्पर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह,, मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यावेळी दृकश्राव्य पद्धतीने होणाऱ्या सोडतीसाठी उपस्थित राहणार आहेत. ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या या कार्यक्रमासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या शरदचंद्र पवार सभागृहात अर्जदारांनी उपस्थित रहावे, असे आवाहन म्हाडाच्या वतीने करण्यात आले आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासह सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील सदनिकांसाठी दहा ऑक्टोबर २०२४ रोजी शुभारंभ करण्यात आला होता. त्यामध्ये एकूण ६ हजार ४२० सदनिकांचा समावेश होता. त्यापैकी २ हजार ७५८ सदनिका प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेच्या, पंढरपूर येथील म्हाडा योजनेच्या २८ सदनिका, पिंपरी-चिंचवडमधील म्हाडाच्या ६५ आणि वीस टक्के सर्वसमावेशक योजनेतील ३ हजार ५६९ सदनिकांचा सोडतीमध्ये समावेश करण्यात आला होता. मात्र दिवाळी आणि विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सदनिकांसाठी अर्ज करण्यास दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती.
प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेमधील २ हजार ७५८ सदनिकांसाठी १ हजार ३७५ अर्ज प्राप्त झाले असून सोडतीसाठीच्या उर्वरीत ३ हजार ६६२ सदनिकांसाठी एकूण ९३ हजार ६६२ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातील ७१ हजार ६४२ अर्जदारांनी अनामत रकमेचा (डिपाॅझिट) भरणा केला असून त्यांचा सोडतमीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
पुणे जिल्हा परिषदेत होणाऱ्या या कार्यक्रमासाठी ज्या अर्जदारांना प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी उपस्थित राहणे शक्य होणार नाही, त्यांना त्यांच्या नोंदणीकृती भ्रमणध्वनी क्रमांकावर मिळालेल्या संदेशामध्ये YouTube URL वरून सोडतीचा कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने पाहता येणार आहे.