महापालिकांच्या हद्दीतील म्हाडाच्या योजनांना अडीच एफएसआय लागू करण्याची नियमावली तातडीने मंजूर करावी, अशी मागणी करत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी म्हाडा कार्यालयासमोर उपोषण केले. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत आहे. मात्र मुख्यमंत्र्यांकडून जादा एफएसआयची नियमावली मंजूर होत नसल्यामुळे उपोषण करण्यात आल्याचा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या वेळी केला.
राष्ट्रवादी काँग्रेस राज्यातील सत्ताधारी पक्ष असला, तरी शेवटी जनतेच्या कामांबाबत आम्हाला जनतेला उत्तरे द्यायची आहेत. म्हाडाच्या सदनिकांना एकऐवजी अडीच चटई क्षेत्र निर्देशांक (फ्लोअर स्पेस इंडेक्स- एफएसआय) मिळावा यासाठी गेली काही वर्षे आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. जादा एफएसआय देण्याचा निर्णयही झाला आहे. मात्र, त्यासंबंधीच्या नियमावलीला मुख्यमंत्र्यांकडून अंतिम मंजुरी मिळत नसल्यामुळे उपोषण केल्याचे म्हाडाचे अध्यक्ष अंकुश काकडे यांनी या वेळी बोलताना सांगितले.
जादा एफएसआयच्या मागणीबाबत आतापर्यंत मुख्यमंत्र्यांना अनेकदा पत्र पाठवली आहेत. निवेदने दिली आहेत. समक्ष भेट घेऊन विनंती केली आहे. मात्र, तरीही निर्णय होत नसल्याचाही आरोप उपोषणाच्या वेळी करण्यात आला. महापौर चंचला कोद्रे, आमदार अनिल भोसले, बापू पठारे, महापालिकेतील सभागृहनेता सुभाष जगताप, शिक्षण मंडळाचे अध्यक्ष रवी चौधरी यांच्यासह अनेक पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते या उपोषणात सहभागी झाले होते.

Story img Loader