कार्यकर्त्यांना सदैव समाधान देणारा, अत्यंत सतर्क आणि क्रियाशील अशी ओळख असलेल्या रामभाऊ म्हाळगी यांची राजकीय कार्यशैली आजच्या राजकारण्यांसाठी अभ्यासाचा व अनुकरणाचा विषय आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांनी केले.
 वाडा संस्कृती अभियानाच्या वर्षपूर्तीनिमित्त व रामभाऊ म्हाळगी यांच्या एकतिसाव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित मेळाव्यात नाईक बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार डॉ. विश्वास मेहेंदळे, ज्येष्ठ विधिज्ञ दादासाहेब बेंद्रे, आमदार गिरीश बापट, भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, भाजपचे गटनेता अशोक येनपुरे, वाडा संस्कृती अभियानचे अध्यक्ष दीपक रणधीर, माजी खासदार अण्णा जोशी यांची या वेळी व्यासपीठावर उपस्थिती होती.
रामभाऊंनी आपल्या गुणवत्तेच्या जोरावर विधिमंडळ व संसदेत स्वत:चा वेगळा ठसा उमटवला होता. प्रत्येक चौकाचौकात सभा घेत जनसंपर्क कसा असावा याचे उत्तम उदाहरण  त्यांनी घालून दिले. पुण्यातील वाडा संस्कृती जीवनशैलीचा त्यांनी पूर्णत: अंगीकार केला होता. रामभाऊंच्या या कार्यशैलीचा आजही अभ्यास होण्याची गरज आहे, असे नाईक म्हणाले. डॉ. मेहेंदळे म्हणाले,‘‘ ‘भाषण’ हे आजच्या काळातही अत्यंत प्रभावी असे माध्यम असून भाषणाच्या जोरावर रामभाऊंनी अनेक सभा गाजवल्या. मात्र, आज तशा प्रकारची भाषणे कोठेही ऐकण्यास मिळत नाहीत.’’
रामभाऊंचा आदर्श ठेवून आजचा कार्यकर्ता घडवण्याचे प्रयत्न व्हावेत, असे आवाहन दादासाहेब बेंद्रे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गिरीश बापट यांनी, तर सूत्रसंचालन अशोक येनपुरे यांनी केले. म्हाळगी यांचे सहकारी अॅड. श्यामराव गोखले, मीराताई पावगी, अच्युतराव पाटणकर, शरद गोखले यांचा या वेळी प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला म्हाळगीप्रेमींचा मेळावा असेच स्वरुप आले होते. नगरसेवक दिलीप काळोखे, तसेच अॅड. जयंत म्हाळगी, भास्करराव रबडे, बापू नाईक आदींची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.