संगणक क्षेत्रातील मातब्बर कंपनी मायक्रोसॉफ्ट, ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या कृत्रीम बुद्धिमत्ता विभाग आणि अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्यातर्फे बारामती येथे सेंटर ऑफ एक्सलन्स ऑन फार्मव्हाइब्जची स्थापना करण्यात आली आहे. या केंद्राच्या माध्यमातून शेतीसाठी कृत्रीम बुद्धिमत्तेवर आधारित अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्यात येणार आहे. अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. डॉ. विवेक भोईटे, डॉ. योगेश जाधव आदी या वेळी उपस्थित होते.
हेही वाचा- पुणे: भूसंपादनाअभावी वाकड-बालेवाडी पुलाचे काम रखडले
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामतीचे कृषी विज्ञान केंद्र, कृषी महाविद्यालय, अटल इन्क्युबेशन सेंटर, मायक्रोसॉफ्ट, ऑक्सफर्ड विद्यापीठ यांच्यातर्फे ३ जानेवारीला बारामती येथे कृषिक प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात मायक्रोसॉफ्टतर्फे राबवण्यात आलेल्या कृषी प्रकल्पातील प्रात्यक्षिके सादर करण्यात येणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन मायक्रोसॉफ्टचे कार्यकारी संचालक डॉ. रणवीर चंद्रा, ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे संचालक डॉ. अजित जावकर यांच्या हस्ते होणार आहे. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, विरोधी पक्ष नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, राहुरीच्या महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे डॉ. प्रशांतकुमार पाटील उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचा- पुणे: भाजपमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर
मायक्रोसॉफ्टच्या मायक्रोसॉफ्ट अझूर या मंचावर फार्मव्हाइब्ज आय हा तंत्रज्ञान संच आहे. बारामती परिसरातील वीस वर्षांतील शेतीसंदर्भात हवामान, माती, पाणी आदींबाबतचा विदा मायक्रोसॉफ्ट आणि ऑक्सफर्डला उपलब्ध करून देण्यात येईल. त्यातून कृत्रिम बुद्धिमत्तेवर, उपग्रहावर आधारित तंत्रज्ञानाद्वारे भविष्यातील अत्याधुनिक शेती तयार करण्यात येईल. या तंत्रज्ञानाचा थेट शेतकऱ्यांना उपयोग होणार आहे.