पुणे : मायक्रोसॉफ्टच्या क्लाउड सेवेतील तांत्रिक बिघाडाचा फटका पुणे विमानतळावरील विमानसेवेला शुक्रवारी बसला. विमान कंपन्यांची ऑनलाइन यंत्रणा बंद पडल्याने कर्मचाऱ्यांना हाताने लिहून बोर्डिंग पास प्रवाशांना द्यावे लागले. या प्रक्रियेला खूप विलंब लागत असल्याने शुक्रवार आणि शनिवारची ४० विमाने रद्द करण्यात आली आहेत. याचबरोबर अनेक विमानांना विलंब होत आहे.
मायक्रोसॉफ्ट ठप्प झाल्याने विमान कंपन्यांची ऑनलाइन यंत्रणा बंद पडली. यामुळे विमान कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांकडून प्रवाशांना बोर्डिंग पास देण्यास विलंब होत होता. प्रवाशांना हाताने लिहून बोर्डिंग पास देण्याची वेळ विमान कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवर आली होती. पुणे विमानतळावरून उड्डाण करणारी २१ विमाने आणि येणारी १९ विमाने अशी ४० विमाने रद्द करण्यात आले. याचबरोबर अनेक विमानांना विलंब होत आहे. विमाने रद्द झाल्याने प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. विमानतळावर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने गोंधळाचे वातावरण आहे.
विमान कंपन्यांकडून प्रवाशांना विमान रद्द झाल्याची माहिती कळविण्यात येत आहे. विमानतळावर प्रवाशांना बसण्यासाठी पुरेशी व्यवस्था करण्याचे प्रयत्न भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून सुरू आहेत. याचबरोबर प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठीही पावले उचलली जात आहेत. विमानतळावर अडकून पडलेल्या प्रवाशांच्या खानपानाची व्यवस्थाही केली जात आहे, अशी माहिती विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली.
याबाबत पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके म्हणाले, की पुणे विमानतळावरून दिवसा विमानांची संख्या कमी आहे. प्रामुख्याने रात्रीच्या वेळी विमानांची संख्या जास्त आहे. त्यामुळे दिवसभर मोठी समस्या निर्माण झाली नाही. तांत्रिक अडचणीमुळे विमान कंपन्यांचे कर्मचारी प्रवाशांना हाताने लिहून बोर्डिंग पास देत होते. या प्रक्रियेला उशीर होऊन काही विमानांना विलंब झाला. विमान कंपन्यांची ऑनलाइन यंत्रणा सुरू न झाल्याने शुक्रवारी आणि शनिवारी नियोजित विमाने रद्द करण्यात आली आहेत.
हेही वाचा : पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांना २५ जुलैपर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर
समस्या सोडविण्यासाठी पावले
याबाबत केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, की मायक्रोसॉफ्टच्या क्लाउड सेवेतील बिघाडामुळे जगभरात अनेक क्षेत्रांना फटका बसला. त्यात भारतातील विमान कंपन्यांच्या ऑनलाइन यंत्रणेचाही समावेश आहे. नागरी हवाई वाहतूक महासंचालनालय आणि नागरी हवाई वाहतूक मंत्रालय परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. तांत्रिक बिघाडाबद्दल प्रवाशांना वेळीच सूचना द्याव्यात, असे निर्देश विमान कंपन्यांना दिले आहेत. प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी आमचे कर्मचारी सातत्याने प्रयत्न करीत आहेत.