पुणे : जगातील तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या मायक्रोसॉफ्ट कंपनीने पुण्यातील हिंजवडीत आणखी ४५३ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. कंपनीने या महिन्यात हिंजवडी गावात १६.४ एकर जमीन खरेदी केली आहे. कंपनीने गेल्या महिन्यातही या ठिकाणी जमीन खरेदी केली होती. यामुळे कंपनीने महिनाभरात हिंजवडीत एकूण सुमारे एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. मायक्रोसॉफ्टच्या या गुंतवणुकीमुळे रोजगार निर्मितीला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मायक्रोसॉफ्ट इंडियाने हिंजवडी गावाच्या हद्दीत ही जमीन खरेदी केली आहे. हिंजवडी हे राजीव गांधी इन्फोटेक पार्कचा भाग आहे. मायक्रोसॉफ्टने ही जमीन व्हिवा हायवेज कंपनीकडून खरेदी केली आहे. हा व्यवहार ४५३ कोटी रुपयांना झाला आहे. या व्यवहारापोटी मायक्रोसॉफ्टने २७.१८ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क आणि ३० हजार रुपयांचे नोंदणी शुल्क भरले आहे. मायक्रोसॉफ्ट इंडियाने ऑगस्ट महिन्यात हिंजवडीत १६.४ एकर जमीन खरेदी केली होती. इंडो ग्लोबल इन्फोटेक सिटी कंपनीसोबत मायक्रोसॉफ्टने ५२० कोटी रुपयांना हा व्यवहार केला होता. या व्यवहारापोटी मायक्रोसॉफ्टने ३१.१८ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क आणि ३० हजार रुपयांचे नोंदणी शुल्क भरले आहे, अशी माहिती सहजिल्हा निबंधक प्रवीण देशपांडे यांनी दिली.

हेही वाचा >>>कारण राजकारण : भाजपकडून खडकवासला मतदारसंघ अजित पवारांना?

मायक्रोसॉफ्टने दोन वर्षांपूर्वी पिंपरी-चिंचवडमध्ये २५ एकर जमीन खरेदी करून तिथे डेटा सेंटरची उभारणी सुरू केली आहे. त्यानंतर कंपनीने आता आणखी जमीन खरेदी केली आहे. आता खरेदी केलेल्या जमिनीचा वापर नेमका कशासाठी करणार हे कंपनीने अद्याप स्पष्ट केलेले नाही.

मायक्रोसॉफ्टची देशात हैदराबाद, बंगळुरू आणि नोएडा येथे डेटा सेंटर सध्या कार्यरत असून, तिथे एकूण २३ हजार कर्मचारी काम करीत आहेत. याचबरोबर कंपनीने याच वर्षी हैदराबादमध्ये ४८ एकर जमीन २६७ कोटी रुपयांना डेटा सेंटर उभारणीसाठी खरेदी केली. त्यानंतर आता हिंजवडीत कंपनीने दोन वेळा जमीन खरेदी केली आहे.

हेही वाचा >>>बारामतीमध्ये अजित पवारच उमेदवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे संकेत; २५ उमेदवार निश्चित?

पायाभूत सुविधा सुधारण्याचे आव्हान

हिंजवडी आयटी पार्कमध्ये माहिती-तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील अनेक मोठ्या कंपन्या कार्यरत आहेत. त्यात इन्फोसिस, विप्रो, कॉग्निझंटसह इतर अनेक कंपन्यांचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून हिंजवडी आयटी पार्कमधील पायाभूत सुविधांचा उडालेला बोजवारा समोर येत आहे. आता तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या मायक्रोसॉफ्टने गुंतवणूक केल्याने आयटी पार्कला गुंतवणुकीसाठी अजूनही पसंती असल्याचे समोर आले आहे. यामुळे पायाभूत सुविधांचा दर्जा सुधारून जागतिक पातळीवरील कंपन्यांना त्या दर्जाची सेवा देण्याची जबाबदारी शासकीय यंत्रणांवर आली आहे.

हिंजवडी आयटी पार्क

आयटी कंपन्या – २००

मनुष्यबळ – ३ लाख

मायक्रोसॉफ्टची हिंजवडीतील गुंतवणूक

सन २०२२ – २५ एकर जमिनीची ३२९ कोटी रुपयांना खरेदी

ऑगस्ट २०२४ – १६.४ एकर जमिनीची ५२० कोटी रुपयांना खरेदी

सप्टेंबर २०२४ – १६.४ एकर जमिनीची ४५३ कोटी रुपयांना खरेदी

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Microsoft has invested thousands of crores in the it park in a month pune print news stj 05 amy