पुणे : मायक्रोसॉफ्ट इंडियाने हिंजवडीत १६.४ एकर जमीन खरेदी केली आहे. इंडो ग्लोबल इन्फोटेक सिटी कंपनीसोबत मायक्रोसॉफ्टने ५२० कोटी रुपयांना हा व्यवहार केला आहे. याआधी मायक्रोसॉफ्टने डेटा सेंटर उभारणीसाठी दोन वर्षांपूर्वी पिंपरी-चिंचवडमध्ये जमीन खरेदी केली होती. मायक्रोसॉफ्टच्या गुंतवणुकीमुळे रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मायक्रोसॉफ्टने हिंजवडी गावाच्या हद्दीत ही जमीन खरेदी केली आहे. हिंजवडी हे राजीव गांधी इन्फोटेक पार्कचा भाग आहे. मायक्रोसॉफ्टने खरेदी केलेली जमीन ही महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) मालकीची नाही. कंपनीने खासगी जमीन खरेदी केली आहे. अशा जमिनीच्या व्यवहारासाठी एमआयडीसीच्या परवानगीची आवश्यकता नसते. त्यामुळे कंपनीने एमआयडीसीकडे यासाठी परवानगी घेतली नव्हती, अशी माहिती एमआयडीसीतील सूत्रांनी दिली.

आणखी वाचा-पुणे शहरात वाहनांची तोडफोड सुरूच; रागातून चाकूने वार आणि फसवणुकीच्या घटनांचीही नोंद

मायक्रोसॉफ्टने दोन वर्षांपूर्वी पिंपरी-चिंचवडमध्ये २५ एकर जमीन खरेदी करून तिथे डेटा सेंटरची उभारणी सुरू केली आहे. त्यानंतर कंपनीने आता आणखी जमीन खरेदी केली आहे. आता खरेदी केलेल्या जमिनीचा वापर नेमका कशासाठी करणार हे कंपनीने अद्याप स्पष्ट केलेले नाही. मायक्रोसॉफ्टची देशात हैदराबाद, बंगळुरू आणि नोएडा येथे डेटा सेंटर सध्या कार्यरत असून, तिथे एकूण २३ हजार कर्मचारी काम करीत आहेत. याचबरोबर कंपनीने याच वर्षी हैदराबादमध्ये ४८ एकर जमीन २६७ कोटी रुपयांना डेटा सेंटर उभारणीसाठी खरेदी केली. त्यानंतर आता हिंजवडीत कंपनीने जमीन खरेदी केली आहे.

आणखी वाचा-पुणे: मुंबई- बंगळुरु महामार्गालगत होणार एसआरए प्रकल्प; प्रकल्प रद्द होण्याकरिता ‘त्या’ व्यक्तीने घेतल्या मृत व्यक्तींच्या सह्या?

हिंजवडीकडे ओढा कायम

हिंजवडी आयटी पार्कमध्ये माहिती-तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील अनेक मोठ्या कंपन्या कार्यरत आहेत. त्यात इन्फोसिस, विप्रो, कॉग्निझंटसह इतर अनेक कंपन्यांचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून हिंजवडी आयटी पार्कमधील अपुऱ्या पायाभूत सुविधांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. याचबरोबर गेल्या १० वर्षांत ३७ कंपन्या आयटी पार्कमधून बाहेर गेल्याचा दावा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मायक्रोसॉफ्टने केलेली गुंतवणूक आयटी पार्कवरील विश्वास वृद्धिंगत करणारी ठरली आहे.

हिंजवडी आयटी पार्क

आयटी कंपन्या – २००
मनुष्यबळ – ३ लाख

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Microsofts big investment in hinjewadi large amount of employment will be created pune print news stj 05 mrj