पुणे : देशभरातील विविध राज्यांमध्ये करण्यात आलेल्या ‘मिड टर्म अचिव्हमेंट सर्व्हे’चे निष्कर्ष जाहीर करण्यात आले. त्यात राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या संपादणुकीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाल्याचे दिसून आले.
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) देशभरातील विविध राज्यांमध्ये दहा जिल्ह्यांमध्ये २२ नोव्हेंबर रोजी सर्वेक्षण केले. राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणाच्या (नॅस) धर्तीवर या सर्वेक्षणाची रचना करण्यात आली होती. त्यानुसार तिसरी आणि पाचवीच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक संपादणुकीचा अभ्यास करण्यात आला. यात राज्यातील यवतमाळ जिल्ह्याचा समावेश होता. यवतमाळमधील सर्वेक्षणसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयाने सहकार्य केले. यवतमाळ जिल्ह्यातील इंग्रजी, मराठी, उर्दू माध्यमाच्या तिसरीच्या ५० शाळांमध्ये, तर पाचवीच्या ४७ शाळांमध्ये भाषा, गणित आणि ईव्हीएस या विषयांवर आधारित प्रश्नांवर सर्वेक्षण करण्यात आले.
वाक्यांचे किंवा परिच्छेदाचे वाचन करणे, ९९९ पर्यंत अंक लिहिणे आणि वाचणे, बेरीज-वजाबाकी, गुणाकार, भागाकार करणे, आकार ओळखणे, घड्याळातील वेळा ओळखणे, प्राणी-पक्षी ओळखणे, नातेसंबंध ओळखणे, वस्तू किंवा चिन्हांची माहिती, विविध खेळ, जागा, शहरे आदींबाबत विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यात आले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या आकलनानुसार उत्तरे दिली. त्यानुसार तिसरीच्या विद्यार्थ्यांना भाषेत ६३, गणितात ५८, तर ईव्हीएसध्ये ५९ गुण मिळाले. त्याचप्रमाणे पाचवीच्या विद्यार्थ्यांना भाषेत ६२, गणितात ४६ आणि ईव्हीएसमध्ये ५१ गुण मिळाले. सरासरी गुणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले. या सर्वेक्षणासाठी विकास गरड, महादेव वांढरे या अधिकाऱ्यांनी राज्य समन्वयक म्हणून काम पाहिले.