कंपन्यांकडे मोकळ्या व पडून असलेल्या शेकडो एकर जागा राज्य शासनाने ताब्यात घ्याव्यात, अशी मागणी शहर शिवसेनेने राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली आहे. उद्योगखात्याशी संबंधित विविध प्रश्नांकडे देसाई यांचे लक्ष वेधून त्यावर योग्य ती कार्यवाही करण्याचे साकडे शहरप्रमुख राहुल कलाटे व गटनेत्या सुलभा उबाळे यांनी घातले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात मोठमोठय़ा कंपन्यांकडे शेकडो एकर जागा पडून आहेत. फिनोलेक्सकडे ५० वर्षांपासून जवळपास ९० एकर जागा रिकामी आहे. प्राधिकरणाकडून टाटा मोटर्सला दिलेली १८८ एकर जागा रिकामी आहे, त्यातील १०० एकर जागा शापूर्जी पालमजी यांच्या ताब्यात असून ती अनेक वर्षे पडून आहे. या जागा शासनाने ताब्यात घेऊन ‘सॉफ्टवेअर पार्क’ उभे करावेत, अशी मागणी कलाटे, उबाळे यांनी केली आहे. याशिवाय, एमआयडीसीमध्ये १५ टक्के बांधकाम करण्याची परवानगी होती, ती आता १० टक्केच आहे. येथील अनेक गोष्टीत अनियमितता असून त्याची सखोल चौकशी करावी. एमआयडीसीच्या १६ झोपडपट्टय़ांचे पुनर्वसन करावे. पाण्याची गळती व चोरी नियंत्रणात आणावी. उद्योजकांच्या पुनर्वसन प्रकल्पातील गाळ्यांची दरनिश्चिती व्हावी. एमआयडीसीची स्वतंत्र अतिक्रमणविरोधी यंत्रणा असावी, आदी विविध मागण्या उद्योगमंत्र्यांकडे करण्यात आल्या आहेत.

Story img Loader