इंद्रापूर : स्थलांतरित पक्ष्यांची ‘पंढरी’ असलेल्या उजनी धरणाच्या पाणफुगवठ्यावर ऋतू बदलाबरोबर विदेशी पाहुणे पक्ष्यांच्या आगमनाला प्रारंभ झाला आहे. पक्ष्यांची ही मांदियाळी देशभरातील निसर्ग आणि पक्षीप्रेमींना भुरळ घालत आहे. सध्या धरण काठोकाठ भरले असल्याने पानथळीअभावी पक्षिप्रेमींना रोहित पक्ष्यांची प्रतीक्षा आहे. मात्र, यंदा हिमालयातील ग्रिफन जातीच्या गिधाडांची या मांदियाळीत नव्याने भर पडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उजनी धरण हे पंचेचाळीस वर्षांपूर्वी निर्माण होऊन नानाविध देशी, विदेशी पक्ष्यांचे आश्रयस्थान म्हणून नावारुपाला आले. दरवर्षी हिवाळ्यात व उन्हाळ्यात धरण परिसरात स्थलांतरित पक्ष्यांचा मोठा वावर या ठिकाणी पाहायला मिळतो. यंदा परतीचा पाऊस जोरदार बरसल्याने उजनी धरण काठोकाठ भरलेले आहे. स्थलांतरित पक्ष्यांचा चराऊ भाग पाण्याने आच्छादित आहे. त्याचप्रमाणे वातावरणातील अस्थिरतेमुळे नेहमी वेळेवर येणारे स्थलांतरित पक्षी यावर्षी उशिराने आगमन करत आहेत.

हेही वाचा – पुणे : घरीच करा हुरडा पार्टी; बाजारात हुरड्याची पाकिटे उपलब्ध, जाणून घ्या दर

गेल्या काही दिवसांपासून समुद्र पक्षी (ही गल्स), चक्रवाक बदक (रुढी शेल्डक), परी बदक (नाॅर्दर्न शाॅवलर), सोनुला बदक (काॅमन टील), शेंद्री बाड्डा (पोचार्ड), मत्स्यघार (ऑस्प्रे) इत्यादी मत्स्याहारी पक्षी येऊन दाखल झाले आहेत. धरणाच्या काठावरील चिखलात आपली लांब चिमट्यासारखी चोच खुपसून जलक्रिमींना लक्ष्य करणारे टिलवा (स्टिंट), तुतुवार(सॅंड पाइपर), पाणटिवळा (गाॅडविट) इत्यादी ‘वेडर पक्षी’ दाखल झाले आहेत. जलाशय परिसरातील उघड्या भूभागावरील गवताळ प्रदेशात विविध ससाणे (फाल्कन), भोवत्या (हॅरिअर), ठिपक्यांचा गरूड (स्पाॅटेड ईगल), मधुबाज (हनी बझर्ड) इत्यादी शिकारी पक्षीही येऊन दाखल झाले आहेत. ज्येष्ठ पक्षी अभ्यासक डॉ. अरविंद कुंभार यांनी याबाबतची माहिती दिली. जलाशयावर आता हिमालयातील ग्रिफन जातीच्या गिधाडांची भर पडली आहे. इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव परिसरात नुकतेच ग्रिफन गिधाडांचे अस्तित्व पक्षी निरीक्षकांना आढळून आले. तपकिरी रंगाची पिसे असलेल्या ग्रिफनच्या मानेवर पिसे नाहीत. पोटाखालील भाग गुलाबी व उदाच्या रंगाचा आहे. त्यावर पिवळसर पट्टे आहेत.

स्थलांतरित पक्ष्यांसाठी उजनी पोषक

उजनी धरणातील पाणीसाठा सुमारे दहा किलोमीटर रुंद व दीडशे किलोमीटर लांब क्षेत्रात पसरला आहे. काठावर विविध प्रजातींची झाडे झुडपे आहेत. पाणलोट क्षेत्रात ऊस, केळी, पंपई, पेरू, चिक्कू आदी फळबागा बहरलेल्या असतात. त्यातून स्थलांतरित पक्ष्यांसाठी आश्रयासह मुबलक खाद्य मिळते. जलाशयातील मासे मत्स्याहारी पक्ष्यांना उपलब्ध होतात. दलदल, पाणथळ भागातील चिखल प्रदेशात, तसेच पाणपृष्ठावर वाढणारी शेवाळ, जलकीटक शिंपले – गोगलगाय सारखे मृदुकाय प्राणी, बेडूक व त्यांची पिल्ले, खेकडे इत्यादी पक्ष्यांचे खाद्यान्न विपुल प्रमाणात उपलब्ध होते.

हेही वाचा – समाजमाध्यमातील खात्यावर पिस्तुलाचे छायाचित्र ठेवणे पडले महाग, तरुणाला अटक

उजनी काठावर पक्ष्यांचा वावर सध्या वाढू लागला आहे. मत्स्याहारी बदके व शिकारी पक्ष्यांचा वावर मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. पुढील काही दिवसांनी धरणातील पाण्याचा विसर्ग झाल्यानंतर जलाशयाच्या काठावर दलदल व चिखलयुक्त परिसर तयार होईल. पुढील काही दिवसांत उजनी धरण परिसरात विविध पक्ष्यांची गर्दी वाढत राहील, अशी माहिती ज्येष्ठ पक्षी व पर्यावरण अभ्यासक डॉ. अरविंद कुंभार यांनी दिली.